अत्यावश्यक सेवा असतानाही रोखल्याने एजन्सी चालकांकडून रोष : मनमानी कारभारामुळे संताप
प्रतिनिधी / बेळगाव
धारवाड येथून शहरात सिलिंडर वाहतूक करणाऱया ट्रकची पोलिसांनी अडवणूक केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी जुने बेळगाव येडियुराप्पा मार्गावर घडला. जीवनावश्यक सेवेमध्ये समावेश होऊनदेखील पोलीस कर्मचाऱयांच्या मनमानीमुळे तब्बल दोन तास ट्रक रोखण्यात आला. यामुळे एजन्सीधारकांनी या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. वारंवार असे प्रकार घडत असून हे न थांबल्यास सिलिंडरचे वितरण थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारत पेट्रोलियमचा एलपीजी सिलिंडर घेऊन येणारा ट्रक शहरात प्रवेश करताना अडविण्यात आला. येडियुराप्पा मार्गावर सेवा बजावित असणाऱया पोलीस कर्मचाऱयांनी आपल्याला ट्रक सोडण्याच्या सूचना नसल्याचे कारण दाखवत तो ट्रक रोखला. आझमनगरमार्गे ट्रक घेऊन जा, असे पोलिसांनी सांगितले. परंतु शहरातील रस्ते बंद असल्याने शहापूरपर्यंत आणणे काहीसे कठीण असल्याचे सांगूनही पोलिसांनी ट्रक पुढे सोडला नाही. शहापूर अळवण गल्ली येथील फिजिकली हॅन्डीकॅप्ड संस्था सिलिंडर वितरणाचे काम करते. त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनाही उद्धट उत्तरे देण्यात आली. यामुळे ट्रक त्या ठिकाणी खाली करण्यास लहान वाहने मागविण्यात आल्यानंतर ट्रक सोडण्यात आला. तब्बल दोन तास ट्रक अडविण्यात आल्याने वितरण करण्यामध्ये अडचणी आल्या. पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. असाच प्रकार पेट्रोल पंपचालकांच्या बाबतीतही घडत असल्याने हे प्रकार थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
…तर खपवून घेणार नाही
गॅस सिलिंडर हे अत्यावश्यक सेवेमध्ये असूनही वाहतूक करणाऱया ट्रकची अडवणूक केली जात आहे. विनंती करूनही सोडण्यात न आल्याने वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यामुळे सर्वसामान्यांची परवड होणार असल्याने आम्ही वितरण सुरू ठेवले. परंतु असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे फिजिकली हॅन्डीकॅप्ड संस्थेचे सेक्रेटरी गिरीष सव्वाशेरी यांनी सांगितले