जयपूर / वृत्तसंस्था
एलपीजी गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱया ट्रकवर वीज कोसळल्यामुळे भयंकर स्फोट होण्याची घटना मंगळवारी रात्री राजस्थानमध्ये घडली. सिलिंडरनी भरलेल्या धावत्या ट्रकवर वीज कोसळल्यामुळे सर्व गॅस टाक्यांचा स्फोट झाला. या घटनेनंतर तब्बल अडीच तास एकामागोमाग एक स्फोट सुरू होते. या घटनेमुळे जयपूर-कोटा हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. तसेच गावातही भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने या साखळी स्फोटांमुळे जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचालकासह अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
राजस्थानच्या जयपूर-कोटा महामार्गावरून मंगळवारी रात्री सिलिंडरने भरलेला ट्रक जात असताना त्यावर अचानक वीज कोसळली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. गॅसच्या टाक्मयांचे साखळी स्फोट सुरू झाले. त्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली. या आगीचा भडका तब्बल 5-7 किलोमीटर पासूनही दिसत होता. स्फोट इतके भयंकर होते की लोखंडी टाक्मयांचे तुकडे हवेत उडून एक ते दीड किलोमीटरपर्यंत उडत होते. काही लोखंडी तुकडे घरांच्या छतावर सुद्धा येऊन पडले. स्थानिक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, आग इतकी भीषण होती की 150 मीटर दूर थांबणे सुद्धा कठीण होते, अशी माहिती जवानांकडून देण्यात आली. या भयंकर घटनेमुळे सुरक्षिततेसाठी सकाळी कोटा, अजमेर आणि जयपूर या दिशेने ये-जा करणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. रात्री उशिराने येथे पोलीसही दाखल झाले होते.