जप्त पेलेला अवैध साठाही गायब झाल्याची चर्चा
स्वतंत्र समितीमार्फत पुन्हा मोजमापे घेत कारवाईची गरज
वाहतूक पास सुरू करण्याच्या सूचनांमागे नेमके कोण?
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कासार्डेसहीत तालुक्यातील अवैध सिलिका मायनिंगच्या अवैध उत्खननाबाबत महसूल विभागाने काहींवर दंडात्मक कारवाई केली. तर अनेकांची मोजमापे घेण्यात आली. तालुकास्तरावरून अहवाल गेला, पण पुढे काय? याचे उत्तर सापडलेच नाही. त्यातच थांबविण्यात आलेले वाहतूक पास देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे पुढे आले आहे. तर दुसरीकडे मोजमापे घेतलेली अवैध सिलिका जागेवर आहे का? याबाबत संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी स्वतंत्ररित्या समिती नेमून मोजमापे घेतलेल्या अवैध सिलिका साठय़ाबाबत खात्री करून सिलिका जागेवर असल्यास लिलाव करणे व नसल्यास गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होण्याची गरज आहे.
कासार्डेसह परिसरातील गावांमधून गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध सिलिकाचे उत्खनन करण्यात आल्याची बाब पुढे आली होती. याप्रकरणीच्या बातम्या पुढे येताच महसूल विभागाने पथकांची नियुक्ती करत संपूर्ण सिलिका असलेल्या भागात तपासणी केली. यावेळी अवैध उत्खननप्रकरणी काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर काहींची मोजमापे घेण्यात आलेली होती. तसेच सापडलेला अवैध सिलिका साठा जप्त करून ठेवण्यात आला असे सांगण्यात आले होते.
कारवाई नाहीच, साठाही गायब?
दरम्यान, दंडात्मक कारवाई झालेल्या प्रकरणी पुढे काय कार्यवाही झाली हे अद्याप पुढे आलेले नाही. याबाबत संबंधितांनी अपिल दाखल केलेले असून त्यावर सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याव्यतिरीक्त दंडात्मक कारवाई न झालेल्या प्रकरणीही काही ठिकाणी अवैध सिलिका साठा आढळून आलेला होता, अशी माहिती पुढे आली होती. मात्र, याप्रकरणी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे मोजमापे घेतलेल्या साठय़ापैकी जागेवर साठा उपलब्ध नसल्याबाबत फक्त एकावर गुन्हा दाखल झाला. परंतु, इतरही अनेक ठिकाणचा साठा गायब झाला असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे.
स्वतंत्र पथकामार्फत चौकशीची गरज
दरम्यान, महसूल विभागाकडून याबाबत चौकशी मोजमापे घेऊन कारवाईबाबतचा अहवाल पाठविण्यात आला होता असे सांगण्यात येते. मात्र, याप्रकरणी त्यावेळी घेण्यात आलेली मोजमापे व आता प्रत्यक्ष उपलब्ध असलेली सिलीका याबाबतची खात्री करण्याची गरज आहे. स्वतंत्र पथकामार्फत याची खात्री करून घेतलेल्या मोजमापापेक्षा साठा कमी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाहीही व्हायला हवी. तसेच ज्यांनी अवैध उत्खनन केले त्यांच्यावर उत्खनाबाबतची कारवाईसोबतच त्यांनी काढलेला साठा गायब झाला असल्यास त्याअनुषंगाने कारवाईही व्हायला हवी.
वाहतूक पास सुरू?
दरम्यान, तालुकास्तरीय महसूल विभागाच्या अहवालानंतर वाहतुकीसह सर्व उत्खननालाही स्थगिती देण्यात आलेली होती. मात्र, त्यानंतर अलिकडेच एका तालुक्याच्या ठिकाणी याबाबत बैठक होत पालकत्व स्विकारलेल्या मंडळींकडून वाहतूक पास सुरू करण्याबाबतचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र, हे आदेश दिल्यानंतर अधिकृतसोबत अनधिकृत सिलिकाची वाहतूकही सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे याप्रकरणी मुळात जाऊन चौकशी केल्यास मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन, वाहतूक, साठा गायब झाला असल्याबाबतची माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, मोजमापे घेतलेला साठा जप्त केला असल्यास व जागेवर शिल्लक नसल्यास दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे दाखल होण्याची कार्यवाही करता येते. तसेच अवैध उत्खनन, वाहतूक केलेल्यांना उत्खनन, ट्रेडींग, वॉशिंगसाठी परवानगी न देण्याबाबतची कार्यवाही झाली तरच अवैध मायनिंगला काही प्रमाणात आळा घालणे शक्य होणार आहे.