चीनच्या वुहान शहरातच कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वप्रथम आढळून आला होता. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक बाधित शहर वुहानच राहिले आहे. परंतु सिवानला आता बिहारचे वुहान म्हटले जात आहे. सिवानमध्ये गुरुवारी सकाळी मिळालेल्या 10 कोरोनाबाधितांमुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 51 पर्यंत वाढली आहे. या 51 पैकी 20 रुग्ण सिवानमधील आहेत.
या 20 पैकी 9 रुग्णांना एकाच महिलेकडून संसर्ग प्राप्त झाला असून हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. ओमानमधून दाखल झालेल्या महिलेमुळे या सर्वांना ही लागण झाली आहे. तर 10 वा रुग्ण 16 मार्च रोजी दुबईमधून परतला होता. उर्वरित 9 रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील अनुक्रमे 50, 29, 26, 20 आणि 18 वर्षीय 5 महिलांचा समावेश आहे. 30 वर्षांचा पुरुष, 12 वर्षांच्या दोन मुली आणि 10 वर्षांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.
आखाती देशांमधून परतलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा वाढत जाऊन आता 20 पर्यंत पोहोचला आहे. परंतु यातील 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पण जिल्हय़ातील आकडेवारीने आरोग्य विभागाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच कारणामुळे सरकारने पूर्ण शक्तिनिशी उपाययोजना राबविल्या आहेत.