केरळहून परतल्याने केली तपासणी
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सायंकाळी कोरोनाच्या संशयित रुग्णला दाखल करण्यात आले आहे. 60 वर्षांच्या एका वृध्दाला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो अलिकडेच केरळहून परतला होता.
बेळगाव तालुक्यातील उत्तर भागातील एका गावात राहणारा वृध्द केरळला गेला होता. केरळमधून परतल्यानंतर त्याला थंड, तापाचा त्रास सुरु झाला. कुटुंबियांनी गुरुवारी वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्यावेळी त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
कोरोना संशयितांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आले आहे. हा वृध्द केरळमधून परतल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून त्याची संपूर्ण तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायंकाळी कुटुंबियांनी त्याला सिव्हिलला आणले. मात्र आपल्यावर उपचार करा, दाखल करुन घेवू नका, असे तो वृध्द सांगत होता.
देवभूमी–केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळेच केरळमधून परतलेल्या वृध्दाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्या वृध्दाची मनधरणी करुन त्याला दाखल केले असून त्याची स्वाब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्याची प्रक्रिया सुरु होती.