वेळेत जेवण न दिल्याने संताप, कर्मचाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांना पुरविण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी विलगीकरण कक्षात वेळेवर जेवण न पोहोचविल्यामुळे गोंधळ माजला. या प्रकाराने संताप व्यक्त होत असून कोरोनाग्रस्तांची परवड कधी थांबणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील सध्याची परिस्थिती ‘बडा घर पोकळ वासा’ अशीच झाली आहे. कारण बिम्समध्ये कोरोनाबाधितांना उत्तम सुविधा पुरविण्यात येत असल्याची फुशारकी मारणाऱया अधिकाऱयांचे बिंग येथील प्रकारामुळे बाहेर पडत आहे. सोमवारी कोरोनाबाधित रुग्ण भुकेने व्याकुळ झाले होते, अशी माहिती मिळाली आहे.
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी बाधितांना अल्पोपहार पोहोचविण्यात आला. दुपारी 1.30 पासून रुग्ण जेवणाची वाट बघत होते. 2.30 वाजले तरी जेवण देण्यात आले नाही. 3 पर्यंत कर्मचाऱयांची प्रतीक्षा करुन 20 हून अधिक जण सोमवारी पुन्हा वॉर्डमधून खाली उतरले. आमच्या पोटात कावळे ओरडत आहेत, जेवण कधी येणार? अशी विचारणा केली.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. मात्र 2.30 वाजण्याच्या सुमारास जेवण पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्यक्षात 3.50 वाजण्याच्या सुमारास या वॉर्डमध्ये जेवण पुरविण्यात आले. खरे तर कोरोना वॉर्डमध्ये वृद्ध, महिला, लहान मुले, गर्भवती उपचार घेत आहेत. वेळेत जेवण न पोहोचल्यामुळे ते भुकेने व्याकुळ झाले होते.
विलगीकरण कक्षात 136 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. रविवारी भात, आमटीत झुरळ आढळल्याच्या प्रकारानंतर चहा, पाणी व जेवणासंबंधी बाधितांनी बिम्स प्रशासनाकडे तक्रारही केली होती. त्यामुळे सोमवारपासून जेवणात एखादे फळ किंवा प्रत्येकांना 2 लीटर बाटलीबंद पाणी देण्याची ग्वाही बिम्समधील अधिकाऱयांनी दिली होती. सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत पाण्याच्या बाटल्या रुग्णांपर्यंत पोहोचल्या नाहीत.
लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व मधुमेहींचा विचार करुन वेळेत अन्न पुरविण्याची मागणी करुनही त्यांना उशीरा जेवण पुरविण्यात आले आहे. याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सोमवारी बहुतेक बाधितांनी वॉर्डमधून खाली उतरुन खाण्यायोग्य जेवण पुरवा, अशी मागणी केल्यामुळे सोमवारी त्यांना उशीरा जेवण पोहोचविण्यात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र बिम्स प्रशासनाच्या या आडमुठेपणामुळे कोरोनाबाधितांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
कोरोनाबाधितांशी धोकादायक खेळ
सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात सध्या सुरू असलेला सावळा गोंधळ लक्षात घेता बिम्स प्रशासन कोरोनाबाधितांशी धोकादायक खेळ खेळत असल्याचा संशय बळावत चालला आहे. कोरोनाच्या भीतीने या वॉर्डमध्ये कोणी जात नाहीत किंवा कोणालाच प्रवेश नाही. अशा परिस्थितीत येथे रोज काय घडते, याची माहिती बाहेर कोण देत आहे? अशी विचारणा बिम्सचे अधिकारी रुग्णांकडे करत होते. या संबंधीचा व्हिडीओ सोमवारी तरुण भारतला उपलब्ध झाला आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी वेळीच लक्ष घालून बिम्स प्रशासनाला समज द्यावी, अशी मागणी होत आहे.