जुने गांधीनगरच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर सुविधा
बेळगाव : / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून वाहतूक सेवा पूर्ण बंद आहे. मात्र, अशा काळात येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णवाहिकांची सेवा रात्रंदिवस 24 तास सुरू आहे. या रुग्णवाहिकांना जुने गांधीनगर येथील अनिल पाटील यांच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर मोफत डिझेल देण्यात येत आहे.
समाजातील सर्व स्तरातून कोरोनाग्रस्तांसाठी मदत होत असतानाच रिलायन्स उद्योग समूहानेदेखील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स समूह कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱया वाहनांना मोफत पेट्रोल आणि डिझेल देत आहे. बेळगाव जुने गांधीनगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर सिव्हिल हॉस्पिलटमधील रुग्णवाहिकांना मंगळवारपासून ही सुविधा देण्यात येत आहे. सिव्हिल हॉस्पिलटच्या मागणी व गरजेनुसार प्रत्येक रुग्णवाहिकेला 50 लिटरपर्यंत मोफत डिझेल दिले जात आहे. ही मोफत सुविधा अनेक रुग्णांची वाहतूक करणाऱया रुग्णवाहिकांना सोयीस्कर ठरत आहे. सध्या शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या परिस्थितीत रुग्णवाहिकांचे काम महत्त्वपूर्ण ठरताना दिसत आहे. त्यातच खासगी वाहतूकदेखील ठप्प करण्यात आल्याने रुग्णवाहिका अनेकांसाठी देवदूत ठरत आहेत.
वाहतूक सेवा बंद असताना कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत गावोगावी फिरून रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविणारी रुग्णवाहिका अनेकांना आधार ठरत आहे. अशा 24 तास सेवा देणाऱया सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांना मोफत डिझेल वाटप केले जात आहे.
सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांना 24 तास सुविधा
अनिल पाटील (पेट्रोलपंप मालक)
रिलायन्स उद्योग समूहाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णावाहिकांना मोफत पेट्रोल व डिझेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोविड-19 साठी सेवा देत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांना मंगळवारपासून मोफत डिझेल देत आहोत. सिव्हिल हॉस्पिटलमधून देण्यात आलेला पास दाखवून चालक डिझेल भरू शकतात. संकटकालीन परिस्थितीत समाजातील सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. याबरोबरच आम्हालाही अशा परिस्थितीत डिझेल देता येत असल्यामुळे समाधान वाटत आहे. पंपावर सिव्हिल हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांना 24 तास ही सुविधा पुरविली जात आहे.