गरीब रुग्णांची हेळसांड, खासगी इस्पितळांचे दर परवडेनात
प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहेत. त्याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. 17 नोव्हेंबरपासून कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा सुरू झाली असली तरी ऑपरेशन थिएटर मात्र अद्याप बंदच आहेत.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले होते. गेले आठ-नऊ महिने या इस्पितळात केवळ कोरोनाबाधित व संशयितांवर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे इतर रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा बंद होत्या. आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार सुरू करण्याचा निर्णय घेऊन 17 नोव्हेंबरपासून येथील ओपीडी सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन नागरिकांसाठी सिव्हिलमध्ये ओपीडी सुरू असल्याचे जाहीर केले होते.
ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना बाहेर पाठविण्यात येत आहे. सर्जिकल विभागात चार ऑपरेशन थिएटर आहेत. त्यातील दोन ऑर्थोपेडिक व दोन सर्जिकल विभागासाठी आहेत. ही चारही ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्यात आली आहेत. कारण याच इमारतीत कोरोनाबाधितांसाठी 200 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्य गरीब रुग्णांना बसत आहे. आठ दिवसांपूर्वी चंदगड तालुक्मयातील एका महिलेवर तातडीची शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. देवरवाडी परिसरातील त्या महिलेला कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, ऑपरेशन थिएटर बंद असल्याचे सांगून तिला खासगी इस्पितळात जाण्यास सांगण्यात आले. अखेर कुटुंबीयांनी कोल्हापूरला नेऊन शस्त्रक्रिया केल्याने तिचा जीव वाचला.
बिम्स प्रशासनाशी चर्चा करणार : जिल्हाधिकारी
प्रत्येक रुग्णाला खासगी इस्पितळाचा खर्च परवडणारा नाही. प्रसूती विभाग वगळता इतर ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्यात आली असून बिम्स प्रशासनाने शस्त्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. रविवारी पत्रकारांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असता ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी बिम्स प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णसंख्या घटल्यानंतर ऑपरेशन थिएटर सुरू
यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. गिरीश दंडगी यांच्याशी संपर्क साधला असता सर्जिकल ब्लॉकमध्ये असलेले चारही ऑपरेशन थिएटर सध्या बंद आहेत. याच विभागात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ही ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्यात आली आहेत. हळूहळू रुग्णसंख्या घटल्यानंतर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.