लॉकअप डेथप्रकरणी सीआयडी चौकशी सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकअप डेथप्रकरणाची चौकशी सुरूच आहे. यासाठी बेंगळूरहून बेळगावला आलेल्या सीआयडीच्या अधिकाऱयांनी शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन कागदपत्रे ताब्यात घेतली. याबरोबरच डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांकडून या घटनेसंबंधी माहितीही जमविण्यात आली.
गेल्या शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असताना बसनगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लद बागेवाडी) याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. घटनेनंतर केवळ दोन दिवसांत सीआयडीचे अधिकारी बेळगाव येथे दाखल झाले आहेत.
गेल्या सोमवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सीआयडीच्या अधिकाऱयांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले होते. डॉक्टरांची भेट घेऊन यासंबंधी त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतली होती. शनिवारी दुसऱयांदा बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. आण्णासाहेब पाटील यांच्या कार्यालयात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांकडून अधिकाऱयांनी माहिती घेतली.
सिव्हिलला जाण्यापूर्वी या पथकातील अधिकाऱयांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकालाही भेट दिली आहे. बसनगौडा यांच्या कुटुंबीयांचीही गुप्त ठिकाणी चौकशी करण्यात आली असून यावेळी कुटुंबीयांनी नेमकी काय जबानी दिली? याचा उलगडा झाला नाही. पहिल्या दिवसापासूनच हे प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबीयांवर पोलिसांचा दबाव आहे.
हे प्रकरण आपल्याला शेकू नये यासाठी पोलीस अधिकाऱयांनी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. देवीला साकडे घालण्यापासून ते काही अधिकाऱयांची खातीरदारी करण्यापर्यंत त्यांनी खबरदारी घेतली आहे. अधिकाऱयांना शवचिकित्सा अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी जवळजवळ पूर्ण होणार आहे. अटक करण्यापासून शवाचिकित्सा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अनेक त्रुटी आढळून आल्या असून तरीही पोलीस अधिकाऱयांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.