बिम्स्च्या अधिकाऱयांना सूचना करण्याची किरण जाधव यांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक जण दाखल होत आहेत. मात्र योग्यप्रकारे उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. तेंव्हा सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारणे गरजेचे असून बिम्स्च्या अधिकाऱयांना सक्त ताकीद करावी, अशी मागणी भाजपचे नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. सर्वसामान्य जनतेला उपचार घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. कारण खासगी हॉस्पिटल्सचा खर्च परवडणारा नाही. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार तसेच औषध उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. तेंव्हा सरकारने त्या ठिकाणी औषध पुरवठा व ऑक्सिजन उपलब्ध करावा. याचबरोबर बिम्स्च्या अधिकाऱयांना सूचना करणे गरजेचे आहे. त्यामुळे निश्चितच येथील कारभार सुधारेल, असे त्यांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले. या हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त बेडची सोय देखील करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी निवेदन स्वीकारले आणि निश्चितच याबाबत पाऊल उचलू, असे आश्वासन दिले.