रुग्णांची होतेय गैरसोय, प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
गरीबांचे इस्पितळ म्हणून ओळख असलेले सिव्हिल हॉस्पिटल या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. सध्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील जलशुध्दीकरण प्रकल्प बंद असल्यामुळे ते पुन्हा एकदा ठळक चर्चेत आले आहे. जिल्हा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याचे सामोरे आले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या सेवेसाठी येणारे नातेवाईक यांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळाले यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिकेने हा प्रकल्प उभारला आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून तो बंद असल्याचे दिसुन आले आहे.
सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर व राहुल पाटील यांनी या परिसरात भेट देवून पाहणी केली असता हा प्रकल्प गेल्या दीड वर्षांपासून बंद पडल्याचे त्यांना दिसून आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ कोरोना बाधितांवर आजवर उपचार करण्यात येत होते. वेगवेगळय़ा संघटनांनी पाठपुरावा केल्यामुळे तीन दिवसांपूर्वीच इतर आजारांवर उपचार सुरू झाले आहेत.
जलशुध्दीकरण प्रकल्प दीड वर्षांपासून बंद आहे तो सुरू करण्यासाठी आजवर प्रयत्न का झाले नाहीत? मोठय़ा प्रमाणात सरकारी निधी खर्चुन उभारण्यात आलेले प्रकल्प बंद असल्यामुळे उपचारासाठी येणाऱया गोर-गरीबांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याची दुरुस्ती का केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात असून महानगरपालिका व पाणी पुरवठा मंडळाने त्वरीत त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.