प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे कोरोना बाधित रुग्ण किती? आणि तेथे उपलब्ध असणारे बेडस् किती याचा तपशील दररोज देण्याची सूचना बिम्स्चे डायरेक्टर डॉ. विनय दास्तीकोप यांनी बिम्स्च्या स्टाफला केली आहे. कोविड इस्पितळात बेडची नेमकी संख्या किती? अशा आशयाचे वृत्त तरुण भारतमध्ये दि. 24 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झाले होते.
वास्तविक यापूर्वीच हॉस्पिटल्सच्या प्रशासनाने दररोज तशी माहिती जाहीर करणे अपेक्षित होते. विजापूर जिह्यामध्ये जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्यामदतीने दररोज ही माहिती संकलीत करुन त्याचा तपशील प्रशासनाला मिळावा, अशी सोय करण्यात आली आहे. बेळगावमध्ये मात्र असे अद्याप झाले नव्हते.
हॉस्पिटल्समध्ये बेडस् नाहीत अशी ओरड मात्र सतत ऐकू येतो. मात्र नेमके वास्तव काय आहे? याचा तपशील उपलब्ध होत नव्हता. या संदर्भात आवाज उठविताच बिम्स्च्या संचालकांनी हॉस्पिटलमधील अधिकारी डॉक्टर्स, नोडल ऑफीसर, मेट्रन यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या आणि शिल्लक बेडस् यांची माहिती दररोज बिम्स्च्या वेबसाईटवर प्रसारीत करण्याची सूचना केली आहे. त्याच प्रमाणे हॉस्पिटलशी संबंधीत ग्रुपवर सुध्दा ही माहिती पाठविण्यात येणार आहे.