आरटीपीसीआर चाचणीसाठी उडत आहे झुंबड
प्रतिनिधी / बेळगाव
परराज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे ही चाचणी करून घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी उसळली असून अक्षरशः त्या ठिकाणी कोविड नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून चक्क सिव्हिल हॉस्पिटलमध्येच हा प्रकार घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी या प्रकाराकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्याही परराज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर ही चाचणी आवश्यक आहे. वास्तविक ही चाचणी करताना तरी सोशल डिस्टन्सची गरज आहे. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या या विभागात कोणतेच नियम पाळले जात नाहीत. प्रत्येकाची धावाधाव आणि खिडकीसमोरच मोठी गर्दी केली जात आहे.
कोविड नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, जनजागृती करणारे व कोरोनाचे नियम सांगणारे मुख्य ठिकाण असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ही अवस्था निर्माण झाली आहे. शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये नियमांचे पालन करावे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी हा प्रकार डॉक्टरांना दिसत नाही का? बिम्सचे कार्यकारी संचालक कार्यरत आहेत की नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱया विभागाला लागूनच हा आरटीपीसीआर चाचणी करणारा कक्ष आहे. त्याच ठिकाणी हा प्रकार घडत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार हे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी अधिकाऱयांना मार्गदर्शन करत आहेत. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्येच हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.