प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना कालावधीत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या औषध निर्माण विभागाकडून एका वैद्यकीय अधिकाऱयाच्या देखरेखीखाली बनवल्या गेलेल्या व नागरिकांना वाटप झालेल्या आर्सेनिक अल्बम गोळय़ा वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत. त्या कार्यवाहीबाबत आरोग्य संचालकांमार्फत चौकशी करण्याच्या जि. प. सदस्य विक्रांत जाधव यांच्या मागणीची गंभीर दखल जि. प. स्थायी समितीत घेण्यात आली. त्यावर योग्य ती कार्यवाही होण्याचे आश्वासन अध्यक्ष रोहन बने यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत जि. प. सदस्य विक्रांत जाधव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आर्सेनिक अल्बम गोळय़ा निर्मिती व वाटप कार्यवाहीवर बोट ठेवले. एप्रिलनंतर जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयाकडून आर्सेनिक अल्बम गोळ्य़ा वाटप करण्याचा निर्णय झाला. जून महिन्यात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले होते. जिल्हा रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरना अशाप्रकारे गोळ्य़ा बनवण्याचा कोणताही अधिकार नाही. ते डॉक्टर रुग्णाला तपासून गोळ्या देऊ शकतात. परंतु अशाप्रकारे विक्रीसाठी करु शकत नसल्याचा मुद्दा जाधव यांनी प्रकर्षाने सभेत उपस्थित केला.
जिल्हा रुग्णालयाने पुरवलेल्या त्या गोळ्यांच्या बॉटल्सवर एक्सपायरी तारीख, बॅच नंबर, परवाना नंबर अशी कोणतीही माहिती दिलेली नव्हती. तसेच त्यांच्याकडे अशा गोळ्या तयार करण्याचा परवानाही नव्हता. औषध खरेदीचा कोटेशन बनवून न घेताच तज्ञ कंपनीला काम दिलेले नाही. तसेच गोळ्यांचे दरही अव्वाच्या सव्वा लावण्यात आले आहेत, असे मुद्दे विक्रांत जाधव यांनी सभेत उपस्थित केले. त्या गोळ्या चढय़ा दराने घेण्यात आला असून त्यांची आरोग्य संचालकांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी स्थायी समितीत केली.
या बाबत स्थायी समिती सभेत उपस्थित संबंधित प्रतिनिधींना विचारणा करण्यात आली. पण गोळय़ा वाटप कार्यक्रमाबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची आरोग्य संचालक मुंबई, सहसंचालक आरोग्य विभाग पुणे यांच्यासह राज्य सरकारच्या लेखा व वित्त विभागाकडून खरेदीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली. सॅनिटायझरच्या बॉटेल्सचाही असाच प्रकार असून दोन्हीचे दर वाढवून लावले होते, असेही सांगितले. जाधव यांनी मांडलेल्या मुद्यांची स्थायी समिती सभेत अध्यक्ष रोहन बने यांनी योग्य ती दखल घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या अधिकाऱयांना दिल्या.