प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात कोरोनाचा स्प्रेड होत आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. शहरात लसीकरण केंद्रे जिल्हा शासकीय रुग्णालय, गोडोली येथील नगरपालिका रुग्णालय व कस्तुरबा रुग्णालय येथे आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयात दररोज लसीकरणासाठी सुमारे 2000 हून अधिक लोक केवळ लसीसाठी जमतात. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत असून जिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्र हे समोरच्या सेंट पॉल स्कूलमध्ये हलविण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. सातारकर नागरिकामधून नाराजीचा सूर उमटू लागलेला आहे.
सातारा शहर व परिसरात कोरोना लसीचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर सकाळी गर्दी होत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात केंद्राबाहेर घेण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक जमतात या गर्दीमध्ये कोरोना लस घ्यायला आलेल्या नागरिकांना लस घेताना गर्दीतूनच पुढे जावे लागते. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. प्रशासनाला अनेकांनी विनंतीही केली. लसीकरण केंद्र हे सेंट पॉल स्कूल मध्ये हलवावे. मात्र, त्याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
आमदार शिवेंद्रराजे लक्ष घालणार का?
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वतः लक्ष घालून कराडमधील व्यवस्था हाताळली आहे. गर्दी होऊ नये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी परफेक्ट नियोजन केलेले आहे. मात्र सातारा शहरात कोरोना लसीकरण केंद्रावर जमत असलेली गर्दी हाताळण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे हे याकडे लक्ष देऊन ती बाब व्यवस्थित पार पडणार का असाही सवाल उपस्थित होत आहे.
एसपी साहेब या गर्दीला कलम 144 नाही काय?
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी जिह्यामध्ये जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या 144 कलमानुसार अनेक ठिकाणी कारवाया करत आहेत. यात्रा असो की मोकाट फिरणारे नागरिक असो त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र लसीकरण केंद्र बाहेरच हजारोंच्या संख्येने जमणाऱया या गर्दीवर कलम 144 लागू होत नाही. काय असाही प्रश्न सर्वसामान्य सातारकरांना पडू लागलेला आहे. एसपी साहेबांनी या गर्दीकडे त्या अँगलने का पाहिले जात नाही. कारवाई या गर्दीवर का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
खासदार उदयनराजेंच्या बूस्टर डोसची गरज
कोरोना रोखण्यात प्रशासन कमी पडतेय अशी आगपाखड करत प्रशासनाला भीक देणारे खासदार उदयनराजे भोसले सिव्हीलमधील लसीकरण केंद्र हलवण्यासंदर्भात कोणता बुस्टर डोस देणार याची सातारकरांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.
लसीच्या कमतरतेमुळे गर्दी वाढते
सातारा शहर लोकसंख्येने मोठे शहर आहे. या शहरात लस घेण्यासाठी जे लोक लसीकरण केंद्रावर जातात. त्यांनी सोशल डिस्टन्स पाळला जात नाही, मास्कही वापरला जात नाही, त्यावर अंकुश ठेवायला हवा. अपुऱया लसीकरच्या पुरवठय़ामुळे गर्दी होवू लागली आहे.
अमोल मोहिते नगरसेवक
लसीकरण केंद्राबाहेर गर्दीला लसीची टंचाई जबाबदार
सातारा शहरातील लसीकरण केंद्राबाहेर गर्दी जमत आहे. त्या गर्दीला लस्सी टंचाई जबाबदार आहे. ज्या प्रमाणात लस येतात त्याच्या दुप्पट चौपट पाचपट नागरिक हे लस घेण्यासाठी येतात. ज्या प्रमाणात येते त्याच प्रमाणात नागरिकांना प्रशासनाने बोलवले गेले पाहिजे.याकरता नियोजन करणे गरजेचे आहे. नियोजन नसल्यामुळेच गर्दी होत आहे.
रमेश बोराटे सातारा
गर्दीमुळे कोरोना संक्रमण होऊ शकते
होम टू होम लसिकरण झाले तर गर्दीच होणार नाही. टीम वर्कनी काम केला तर सहज शक्य आहे. लसीचा साठा कमी पडतोय. पुरवठा आणि प्लॅनिंग चांगलं करावं लागेल. तरच सगळ्यांना लस घेता येईल. पण क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात लसीकरण घेण्यासाठी जी गर्दी होत आहे ती टाळली गेली पाहिजे.
विजय पवार, गोडोली फोटो 24एसएटीए16
प्रशासनाने सामाजिक संस्थाना समावेश करून घेतले पाहिजे
कोरोनाच्या महामारीच्या संकटातून वाचले पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांनाही समावेश करून प्रशासनाने घेतले पाहिजे आम्ही तीन पर्याय दिले होते. तिन्ही पर्याय छान होते. गर्दी ही टाळता आली असती पण प्रशासन नुसते मान डोलावते अन् प्रत्यक्षात काहीच करत नाही. लसीकरण केंद्राबाहेर गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेणे प्रशासनाने जबाबदारी घ्यायला हवी.
प्रशांत मोदी, सामाजिक कार्यकर्ते