सातारा / प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवसांपूर्वीच सिव्हील सर्जनच्या दालनात झालेला राडा ताजा असतानाच पुन्हा एका वरिष्ठ डॉक्टरांचा दलनात मुकादमाला मारहाण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये एका वरिष्ठ डॉक्टरांच्या दालनात किरकोळ भांडणावरून कायम नोकरीत असलेल्या एका मुकादमाला येथील सुरक्षा रक्षकाकडून डॉक्टरांसमोर मारहाण झाली. दुपारचा वेळेत एकावेळी 5 सुरक्षा रक्षक कसे जेवायला बसले, एकआडएक जेवण करा असे या मुकादमाने सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हा विषय येथील वरिष्ठ डॉक्टरांच्या दालनात पोहचला. या वेळी आपापली बाजू मांडताना सुरक्षा रक्षकांकडून डॉक्टरसमोरच मुकादमाला मारहाण करण्यात आली.
यामुळे जिल्हा रुग्णालयातील मुकादमासह सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करत सिव्हील सर्जन सुभाष चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली. यावेळीही कोणतीही कठोर भूमिका न घेता आपापसात मिटवून घ्या, अशी भूमिका सिव्हील प्रशासनाने घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सिव्हील सर्जन डॉ. चव्हाण यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही, हे यानिमित्ताने सिद्ध होत आहे.