ग्रामीण भागातील प्रवासी अंधारात : बंद पथदीपांचा फोटो वापरणे
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हील हॉस्पिटल रोडवरील पथदीप मागील वर्षभरापासून बंद आहेत. या परिसरात ग्रामीण भागात जाणारे प्रवासी बसची वाट पहात असतात. रात्रीच्या वेळी पथदीप बंद असल्यामुळे या प्रवाशांना अंधारात उभे राहण्याची वेळ आली आहे. दररोज शेकडो प्रवासी येथील गावी जात असले तरी पथदीप नसल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हे पथदीप पुन्हा सुरू करावेत अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात डेकोरेटीव्ह पथदीप बसविण्यात येत आहेत. यासाठी जुने पथदीप काढून त्या ठिकाणी नवे पथदीप बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु चन्नम्मा चौकापासून सिव्हील हॉस्पिटल रोडवर नवे पथदीप अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. तसेच जुने पथदीपही बंद करण्यात आले आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱया चन्नम्मा चौकातच पथदीप बंद असल्याने शहरातील इतर भागाचा विचार न केलेलाच बरा अशा प्रतिक्रिया नागरिक मांडत आहेत.
सायंकाळी 6 नंतर आपापल्या गावी परतण्यासाठी शेकडो प्रवासी या ठिकाणी उभे असतात. पुरूषांबरांबरच महिला, विद्यार्थीनि बसची वाट पहात या ठिकाणी थांबतात. परंतु पथदीप नसल्यामुळे अनेकवेळा बस येवून गेली तरी त्याची माहिती प्रवाशांना होत नाही. तसेच गर्दीचा फायदा घेत पाकिटमारांकडून हात साफ करून घेण्यात येतात. याचबरोबर सरकारी हॉस्पिटलमध्ये येणारे रूग्ण देखील बसची वाट बघत याठिकाणी थांबलेले असतात. परंतु पथदीपा अभावी रूग्ण व नागरिकांना अंधारात उभे रहावे लागत आहे.
कडोली, केदनूर, मण्णीकेरी, जाफरवाडी, अगसगा, काकती, होनगा या गावचे प्रवासी या बस थांब्यावर बससाठी थांबतात. परंतु मागील वर्षभरापासुन पथदीप बंद असल्यामुळे या गावच्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे हे पथदीप पुन्हा सुरू करावेत अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.