वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमध्ये सिस्टर अभया हत्येप्रकरणी दोषी ठरलेले फादर थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांना जन्मठेप ठोठावण्यात आली होती. दोघांनाही प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी 28 वर्षे 9 महिन्यांनी निर्णय झाला आहे. दोन्ही गुन्हेगारांच्या विरोधात भादंविचे कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा नोंद होता. दोघेही 2009 पासून जामिनावर होते. तर अन्य आरोपी पाद्री जोस पुथरीक्कल यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
19 वर्षीय सिस्टर अभया यांच्या हत्येमुळे पूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली होती. त्यांचा मृतदेह 27 मार्च 1992 रोजी कोट्टायमच्या एका कॉन्व्हेंटमधील विहिरीत मिळाला होता. अभया यांनी दोन पाद्री आणि नन सेफी यांना पायस कॉन्व्हेंट हॉस्टेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. याची सिस्टर अभया यांच्याकडून वाच्यता होण्याची भीती गुन्हेगारांना सतावत होती. याच भीतीपोटी कोट्टूर यांनी अभया यांचा गळा आवळला तर सेफी यांनी कुऱहाडीने हल्ला केला होता. हत्येनंतर त्यांनी अभयाचा मृतदेह विहिरीत फेकला होता.
49 साक्षीदार उलटले
अभया हत्या प्रकरणाला अनेक वळणे प्राप्त झाली होती. हत्येच्या 16 वर्षांनी म्हणजेच नोव्हेंबर 2008 मध्ये आरोपींना अटक करण्यात आली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान 49 साक्षीदार उलटले होते. यातील बहुतांश जण चर्चशी संबंधित होते. या खटल्याच्या मुख्य साक्षीदारांपैकी अडक्का राजू यांची साक्ष सर्वात महत्त्वाची ठरली होती.