प्रतिनिधी/ बेळगाव
बहुचर्चित सोने चोरीप्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीचे पथक पुन्हा बेळगावात आले आहे. कोणकोणत्या हॉटेलमध्ये सोने चोरी प्रकरणी व्यवहार झाला होता त्या हॉटेलना या पथकातील अधिकाऱयांनी भेटी देवून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आहेत.
शुक्रवारी सीआयडीचे अधिकारी बेळगावात आले आहेत. 9 जानेवारीनंतर संकेश्वर व बेळगाव येथील काही लॉजमध्ये चोरी प्रकरणातील आरोपींनी बैठका घेतल्या आहेत. व्यवहारासाठी या बैठका होत्या. चौकशीत या संबंधीची माहिती उघडकीस आल्यानंतर अधिकाऱयांनी त्या हॉटेल्सना भेटी देवून फुटेज तपासले आहेत.
मंगळूर येथून कोल्हापूरकडे निघालेली कार अडवून कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोन्याची हुबळी येथे विक्री करण्यात आली होती. मंगळूर येथील तिलक पुजारी या सराफाने केलेल्या तक्रारीवरुन हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले असून सीआयडीने तपास हाती घेतल्यानंतर चार पोलीस अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सीआयडीच्या अधिकाऱयांनी हाती घेतले आहे. गेल्या आठवडय़ात हुबळी परिसरातही सीआयडीच्या अधिकाऱयांनी तपास केला होता. शुक्रवारी गृहमंत्री बसवराज बोम्मई बेळगाव दौऱयावर आले होते. सीआयडी चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. एकंदर सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.