पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप, राष्ट्रीय पातळीवर प्रकरणाची चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
आठ दिवसांपूर्वी एकसंबा, ता. चिकोडी येथे पोलीस व सीआरपीएफ जवानामध्ये झालेल्या झटापटीत जखमी जवानाची बुधवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या राष्ट्रीय पातळीवर ठळक चर्चेत आले आहे. त्यामुळे पोलीस-सीआरपीएफ यांच्यातील संघर्षही वाढत चालला आहे.
सचिन सुनील सावंत (वय 27) या जवानाला सीआरपीएफच्या रुग्णवाहिकेतून बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलला आणण्यात आले. तत्पूर्वी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका झाल्यानंतर तोराळी येथील सीआरपीएफच्या बटालियनमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
पायांना बेडय़ा ठोकून या कोब्रा कमांडोला बेदम मारहाण केल्यामुळे याच्या अंगावर वळ उठले आहेत. गृहमंत्री एस. आर. बोम्माई यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला असून बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास हे सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार जवानाला मारहाण करणाऱया व त्याच्या पायात बेडय़ा ठोकणाऱया पोलिसांविरुद्धही प्रतिफिर्याद दाखल करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिको लिगल केस म्हणून या प्रकरणाची नोंद करून जवानाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
23 एप्रिल रोजी एकसंबा येथे ही घटना घडली होती. त्यानंतर सचिन सावंत या कमांडोवर सदलगा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने मंगळवारी त्याला जामीन मंजूर केला आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी सचिनला तोराळीच्या तळावर नेले. या तळावर वरिष्ठ अधिकाऱयांनी त्याची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे.
सचिनच्या पायांना बेडय़ा घातल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे केवळ बेळगाव आणि कर्नाटकच नव्हे तर देशभरात बेळगाव पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. सीआरपीएफच्या वरिष्ठनी राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्याशीही चर्चा केली असून राज्य सरकारनेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
सुरुवातीला बेळगाव उत्तरचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास व जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी स्वतंत्रपणे माहिती देऊन या प्रकरणातील पोलिसांचे समर्थन केले होते. त्या जवानाच्या पायांना बेडय़ा ठोकून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस येताच सीआरपीएफच्या वरि÷ांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. दरम्यान, बुधवारी सचिन सावंतची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीत त्याच्या अंगावर उठलेले काळेनिळे वळ स्पष्ट दिसत आहेत.
सदलगा पीएसआय निलंबित
या घटनेसंबंधी सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बुधवारी रात्री ही माहिती दिली आहे. गैरवर्तन व दुर्लक्षपणाचा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून खातेनिहाय चौकशी राखून ठेवण्यात आली आहे. एकंदर परिस्थिती पाहता या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.