जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना सूचना
बेळगाव / प्रतिनिधी
सीईटी परीक्षा 30 आणि 31 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असून सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱयांनी आणि कर्मचाऱयांनी योग्य ती काळजी घ्यावी, कोणत्याही प्रकारचे गैर प्रकार घडू नयेत, याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱयांना सांगितले.
जिल्हा पंचायतच्या सभागृहात सीईटी परीक्षेबाबत बैठक शुक्रवारी घेण्यात आली. त्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सूचना केल्या. कोरोनामुळे विद्यार्थी तसेच पालक तणावाखाली आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांची अधिक काळजी घ्या. परीक्षा केंद्र कंटेन्मेंट झोनमध्ये असणार नाही याची खबरदारी घ्यावी, प्रत्येक वर्गात 24 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी असू नयेत, तोंडाला मास्क, केंद्राजवळ सॅनिटायझरची
व्यवस्था व सोशल डिस्टंन्सिंग असावे, याबाबत जातीने लक्ष द्या, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले.
सीईटी परीक्षा आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचे योग्य पालन करावे, अधिकारी व कर्मचाऱयांनी जागृत राहून ही महत्वाची परीक्षा सुरळीत पार पाडावी, असे सांगितले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्हि, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, मनपा आयुक्त जगदीश के. एच. याबरोबरच शिक्षणाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.