नवोदितांना मिळणार लाभ, दिल्ली कॅपिटल्स सरावासाठी सहा गोलंदाज नेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यावर्षीची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार असल्याने किमान 50 नवोदित खेळाडूंना त्याचा विशेष फायदा होणार आहे. सदर खेळाडूंना आठ पँचायजी आपल्या संघासमवेत सरावाचे खास गोलंदाज म्हणून संयुक्त अरब अमिरातला घेऊन जाणार आहेत.
चेन्नई सुपरकिंग्स, कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स या किमान तीन प्रँचायजींनी नेट बॉलर्सना नेण्याची तयारी चालविली आहे. यामध्ये प्रथमश्रेणी, यू-19, यू-23 राज्यस्तरीय संघातील खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना धोनी, रैना, ऋषभ पंत यासारख्या नामवंत खेळाडूंना महिनाभर गोलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत दरवर्षी नेट गोलंदाज म्हणून स्थानिक व कनिष्ठ गटातील खेळाडूंचा वापर केला जात असे. पण यावेळी जैवसुरक्षिततेची उपाययोजना काटेकोरपणे अमलात आणावयाची असल्याने प्रत्येक प्रँचायजींना सरावासाठी दर्जेदार गोलंदाजांचीच सोय करावी लागणार आहे.
बीसीसीआयने प्रत्येक संघाला 24 खेळाडू नेण्याची मर्यादा घातलेली आहे. पण प्रँचायजींनी अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. पण प्रत्येक संघानुसार ती वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. बहुतेक सर्व प्रँचायजी तेथील स्थानिक गोलंदाजांना निवडणार नाहीत, हीच जास्त शक्यता आहे. ‘नियोजनानुसार सर्व झाले तर सरावासाठी आम्ही सुमारे 10 गोलंदाजांना यूएईला घेऊन जाण्याची योजना आखली असून स्पर्धा सुरू होईपर्यंत ते संघासमवेतच राहणार आहेत,’ असे सीएसके संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले.
कोलकाता नाईट रायडर्सनेही आपल्या संघासमवेत 10 नेट गोलंदाजांना नेण्याचे निश्चित केले असून मुंबईचा माजी कर्णधार व अकादमी प्रशिक्षक अभिषेक नायर त्यांची निवड करणार आहे. ‘रणजी करंडकातील खेळाडूंची तसेच यू-23, व यू-19 राष्ट्रीय स्पर्धेतील काही खेळाडूंची यासाठी निवड केली जाईल,’ असे केकेआरमधील माहितगार सूत्राने सांगितले. दिल्ली कॅपिटल्सनेही सहा नेट गोलंदाजांना नेण्याचे ठरविले आहे. ते संघासमवेत राहणार असून सरावासाठी ते मैदानावर संघासमवेतच जाणार आहेत,’ असे प्रँचायजीमधील सूत्राने स्पष्ट केले. राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे संघही नेट गोलंदाजांची संख्या निश्चित करण्याचे काम करीत असून ते आपापल्या अकादमीतील गोलंदाजांना निवडण्याची जास्त शक्यता आहे.
यू-19 मधील माजी खेळाडू आदित्य ठाकरेला आरसीबीने घेऊन जाण्याचे ठरविल्यास त्याला बराच फायदा होऊ शकतो. कारण त्याला कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाला गोलंदाजी करण्याचा अनुभव मिळणार आहे. तो आरसीबीच्या विकसनशील संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे, असे प्रँचायजीतील सूत्राने सांगितले. अमिरातला घेऊन जाणाऱया नेट गोलंदाजांमध्ये फिरकी गोलंदाजांचा जास्त समावेश असणार आहे. दुबईच्या संथ खेळपट्टय़ांवर आणि दमट हवामानात फिरकी गोलंदाज उपयुक्त ठरणार असल्याने प्रत्येक प्रँचायजी नेट गोलंदाज म्हणून स्पिनर्सना जास्त संधी देतील. त्यात बऱयापैकी अनुभव असणारे डावखुरे व मनगटी स्पिनर्स यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याचेही या सूत्राने सांगितले.
फॅफ डु प्लेसिस, एन्गिडी 1 सप्टेंबरला संघात दाखल होणार
चेन्नई : आयपीएलसाठी चेन्नई सुपरकिंग्स संघ 21 ऑगस्ट रोजी दुबईला प्रयाण करणार असून संघात असणाऱया विदेशी खेळाडूंशिवाय ते जाणार आहेत. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होत असून या संघातील दक्षिण आफ्रिकन खेळाडू फॅफ डु प्लेसिस दुसऱया मुलाच्या प्रतीक्षेत असल्याने तो 1 सप्टेंबर रोजी संघात सामील होणार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यासमवेत वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीही जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॅटसन, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी 22 ऑगस्टपर्यंत संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.