बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सामान्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी कर्नाटक सरकारने शुक्रवारी राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सीटी-स्कॅन आणि डिजिटल एक्स-रेचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. कोविड-१९ संसर्ग शोधण्यासाठी सीटी-स्कॅन किंवा एक्स-रेची आवश्यकता वाढत असल्याने खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये सीटी-स्कॅन आणि डिजिटल एक्स-रेची किंमत अनुक्रमे १५०० आणि २५० केली होती. पण आता सरकारने सीटी स्कॅन करण्यासाठी निश्चित केलेली रक्कम वाढवून २५०० केली आहे. परंतु बीपीएल श्रेणीतील रूग्णांसाठीहा दर १५०० रुपये राहील, असे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान मंत्री सुधाकर यांनी नवे दर निश्चित करताना, “काही रुग्णालये आणि प्रयोगशाळेतील लोक जास्त दर आकारून लोकांचे शोषण करीत असल्याच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या आधारे सरकारने सीटी-स्कॅन आणि डिजिटल एक्स-रेच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे आणि जास्त दर आकारणार्या रुग्णालये आणि लॅबवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा याआधी मंत्र्यांनी दिला आहे. तसेच सरकारी रुग्णालये सीटी-स्कॅन व एक्स-रे सुविधा विनाशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.