तपास अहवालाबाबत सूत्रांचा दावा _ अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर तपासातील काही माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा दावा या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने केला आहे. यासंबंधीचा अहवाल अद्याप उघड करण्यात आला नसला तरी सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला जात आहे. चौकशी समिती लवकरच आपला अहवाल हवाई दलाला सादर करणार असून त्यानंतरच दुर्घटनेमागील निश्चित कारण उघड होणार आहे.
सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 12 जणांच्या अपघाती मृत्यूची चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश दिले होते. याच एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकशी पूर्ण केली असून खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे मत अहवालात नोंदवण्यात आले आहे. सदर तपास अहवाल कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवला आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायूसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, वायूसेनेने किंवा संरक्षण मंत्रालयाने अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
मानवी चुकांसह सर्व संभाव्य पैलूंनी तपास
एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने अपघातासाठी जबाबदार असलेल्या संभाव्य मानवी चुकांसह सर्व संभाव्य पैलूंची तपासणी केली आहे. हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत असताना पायलट हेलिकॉप्टरची दिशा भरकटला का? हेही तज्ञांनी तपासले आहे. याबाबत लवकरच अधिकृत खुलासा केला जाऊ शकतो. सध्या ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे निष्कर्ष आणि त्याद्वारे अवलंबलेली कार्यपद्धती कायदेशीररित्या तपासली जात आहे. त्यानंतर तपास पथकाने सर्व विहित नियम आणि प्रक्रियांचे पालन केले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी कायदेशीर तपासणी केली जाणार आहे.
वेलिंग्टनचे हेलिपॅड लँडिंगसाठी अवघड ठिकाण
सीडीएस रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेले ठिकाण वेलिंग्टन हेलिपॅड परिसरात होते. सदर वेलिंग्टन हेलिपॅड लँडिंगसाठी सोपे नसल्याचा दावा हवाई तज्ञांनी केला आहे. या भागात घटनाट जंगल आणि पर्वतरांगा असल्यामुळे पायलट दूरवरून हेलिपॅड पाहू शकत नाही. अगदी जवळ आल्यानंतरच हेलिपॅड दिसते. अशा परिस्थितीत जेव्हा वैमानिकाने खराब हवामानात उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ढगांमुळे दृश्यमानता कमी झाली असावी. त्यानंतर हेलिपॅड नीट न दिसल्यामुळे अपघात झाला असावा, असे निरीक्षणही नोंदवले जात आहे.
‘एमआय-17 व्ही5’ अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर
रशियन बनावटीचे दोन इंजिन असलेले ‘एमआय-17 व्ही5’ हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते. हे हेलिकॉप्टर प्रामुख्याने सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी वापरले जाते. तरीही सीडीएस रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.