सहा महिला बनवतात 550 रूग्णांचा आहार; सेमी अॅटोमॅटीक चपाती मशिनचा प्रस्ताव ठप्प
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
साडेसहाशे बेडच्या सीपीआरसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर.. स्टाफ अवघ्या सहा जणींचा.. सहा तासांत दोघीजणी 550 रूग्णांसाठी लाटतात 1500 चपाती.. सहा वर्षे सीपीआरचे किचन पुरेसा स्टाफ अन् आधुनिक यंत्रसामग्रीअभावी व्हेंटिलेटरवर आहे. येथून 6 ते 7 वेळा चपाती मशिनचा प्रस्ताव दिला, पण सेमी अॅटोमॅटीक मशिनसाठी चार लाखांचा निधीही मिळेना. डोनर देऊनही दुर्लक्ष. त्यामुळे यामागे शासकीय किचनच्या खासगीकरणाचा डाव असण्याची शक्यता वाढू लागली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल, सीपीआरचा कारभार पहात आहे. या संस्थानकालीन इमारतीत पुर्वी प्रमिलाराजेंचा वावर होता. याच परिसरात घोड्यांचा पागा होता. सध्या या इमारतीच्या एका भागात सीपीआर हॉस्पिटलचे किचन आहे. तेथे सहा महिला कार्यरत आहेत. येथे दुप्पट स्टाफची आवश्यकता आहे. या सहा जणींपैकी एक फक्त भाजीपाला चिरणे, निवडण्यात असते. दोघी चपातीचे पीठ मळण्यापासून गोळे करून लाटण्यात अडकतात. एक चपाती भाजण्यात तर उर्वरीत दोघी वरण, भात, आमटी बनवतात. त्यामुळे यंत्राप्रमाणे त्यांचे काम सुरू रहाते.
‘सीपीआर’ मध्ये सध्या कोरोनाचे 450 अन् म्युकरचे 100 रूग्ण आहेत. त्यांना नियमित आहाराशिवाय भाताची पेज, डाळींचे सुप लागते. हे सुप, पेज याच किचनमधून दिले जाते. रूग्णांना रोज चपाती, भाजी, भात अन् वरण-आमटीचा आहार सकाळ, सायंकाळ दिला जातो. सोबत सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, कोरोना रूग्णांना अंडी दिली जातात. या सर्वांचे नियोजन किचनमधील डायटीशन, आहारतज्ञ करत असतो. आहारासाठी किचनला रोज 55 किलो तांदूळ, 55 किलो गहू पीठ, आटा, 30 किलो डाळ, 50 किलो भाजीपाला लागतो. याचे नियोजन सहा जणींचा स्टाफ करतो. पीठ मळण्याच्या मशिन वगळता अन्य काम हा स्टाफ करत असतो.
रोज सकाळी आणि सांयकाळी मिळून सुमारे 1500 चपात्या बनवल्या जातात, त्यासाठी सकाळी साडेअकरा ते अडीच अन् सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत येथे चपात्या लाटल्या जातात. दोघीच हे काम करतात. चपातीचे काम कमी होण्यासाठी विभागाने प्रशासनाला साडेतीन लाखांच्या अॅटोमॅटीक चपाती मशिनचा प्रस्ताव 2015 मध्ये दिला, त्यानंतर सातत्याने सहा ते सात वेळा प्रस्ताव दिला, चपाती मशिनसाठी डोनरही दिला, पण तरीही प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यामुळे किचन व्हेंटिलेटरवर अशी येथील स्थिती आहे.
अॅटोमॅटीक चपाती मशिनची किंमत 11 लाखांपर्यंत आहे, सेमी अॅटोमॅटीक मशिनची किंमत 4 लाखांपर्यंत आहे. या मशिनवर तासांत 500 चपात्या होतात. फक्त मशिनमध्ये गोळे टाकण्यासाठी फक्त कर्मचारी लागतो. त्यामुळे अॅटोमॅटीक चपाती मशिन मिळाल्यास रूग्णांना ताज्या चपात्या मिळणार आहेत. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने किचनसाठी सेमी अॅटोमॅटीक चपाती मशिनला तातडीने निधी देण्याची मागणी वाढत आहे.