अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची नांदेडला बदली
प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची नांदेड येथे शुक्रवारी बदली झाली. त्यांच्या जागी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रदीप दीक्षित यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी सायंकाळी सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाला मिळाले.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडे कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. यापुर्वी ते नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगचिकित्सा विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर गेली वर्षभर त्यांनी कोल्हापुरातील अधिष्ठातापदाचा कार्यभार पाहिला. डॉ मोरे यांच्या अधिष्ठाता पदाच्या कार्यकाळात हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँक, 5 पदव्युत्तर अभ्यासक्रमांना परवानगी मिळाली आहे.
प्राध्यापकपदाच्या एकत्रित सेवाज्येष्ठता यादीनुसार अधिष्ठात संवर्गातील पदोन्नतीतील विचारक्षेत्रात समाविष्ट अध्यापकांना अधिष्ठातापदाचा अतिरिक्त पदभार दिल्यास त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव येईल, ही बाब विचाराधीन होती. त्यानुसार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रदीप दीक्षित यांची कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यायवैद्यकशास्त्र विभागातील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आल्याची माहिती सीपीआर हॉस्पिटलमधून देण्यात आली. यासंदर्भातील आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढले आहेत.