प्रतिनिधी / कोल्हापूर
लोणार वसाहतीतील राजीव गांधी वसाहतीत राहणाऱया मुबारक अब्दुल शेख (वय 46) याचा बुधवारी दुपारी सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृताचा स्वॅब घेण्यात आला असून तो मिरजेला तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल गुरूवारी मिळण्याची शक्यता आहे. मुबारक शेख यांचा कोरोना संशयित मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सीपीआरमध्ये दिवसभरात 95 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 61 जणांचे स्वॅब पुणे, मिरजेला पाठवले आहेत. मंगळवारी पाठवलेले 41 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्हय़ात आजपर्यत तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील भक्तीपुजानगरमधील दोघांवर उपचार केले असून त्यांचे कोरोंटाईन पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपुर्वी कसबा बावडा मराठा कॉलनी येथील वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर सीपीआर कोरोना हॉस्पिटलमधील आयसोलेटेड वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्याशी संपर्क आलेल्यांची तपासणी केली आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे कोरोना रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत. बुधवारीही या परिसरातील 20 जणांची सीपीआरमध्ये तपासणी करण्यात आली.
दरम्यान, लोणार वसाहतीतील मुबारक अब्दुल शेख (वय 46) याला लिव्हरचा त्रास होत होता. त्याच्यावर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी त्याची धाप वाढल्याने तातडीने त्याला दीडच्या सुमारास सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर कोरोना आयसोलेटेड वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. तासाभरात अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याची कोणतीही ट्रव्हल हिस्ट्री मिळालेली नाही. त्याला लिव्हरचा त्रास होता, असे निदान वैद्यकीय अधिकाऱयांनी केले आहे. तरीही त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. कोरोना संशयित मुबारक शेख याचा मृत्यू कोरोनानेच झाला का, हे गुरूवारी एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सीपीआर प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, सीपीआर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन वॉर्डमध्ये ओपीडी सेवा सुरू झाली आहे. बुधवारी 17 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अधिकतर सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण होते. सध्या कोरोना वॉर्डमध्ये 30 जण उपचार घेत आहेत. यामध्ये 19 पुरूष आणि 7 महिलांचा समावेश आहे. तसेच 2 मुले आणि 2 लहान मुलींचा समावेश आहे. सायंकाळी पुन्हा या वॉर्डमध्ये काहीजण दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
41 रिपोर्ट निगेटिव्ह, अद्यापी 50 रिपोर्ट पेंडींग
जिल्हय़ात कोरोना संशयितांचे स्वॅब पुणे आणि मिरज येथील एनआयव्ही प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सोमवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी 41 जणांचे कोरोना रिपोर्ट बुधवारी निगेटिव्ह आले आहेत. तसेच 50 जणांचे स्वॅब रिपोर्ट अद्यापी प्रलंबित आहेत. बुधवारी सीपीआरमध्ये कोरोना संशयित 95 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 61 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील 36 स्वॅब पुण्याला तर 14 स्वॅब पुण्याला पाठवले आहेत.