कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोनाला प्रतिबंधासाठी सीपीआर आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये सोमवारी सॅनिटनायझर चेंबर उभारण्यात आले. या चेंबरमधून जाणारी व्यक्ती पुर्णपणे निर्जंतूक होते. हे चेंबर्स इचलकरंजी येथील आयजीएम आणि गड†िहंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात उभारले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही असे सॅनिटनायझर चेंबर होणार आहे. सीपीआरमध्ये संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी स्वॅब केबीन उभारली आहे. त्यामुळे वैद्यकीय स्टाफची सुरक्षितता वाढली आहे.
जिल्हय़ात आजपर्यत कोरोना संशयित असल्याने कोरोंटाईन झालेल्यांची संख्या 77 हजारांवर पोहोचली आहे. आजपर्यत तीनशेहून अधिक जणांचे स्वॅब घेण्यात आले. 1 एप्रिलपासून सीपीआर हॉस्पिटल कोरोना आयसोलेटेड झाले, पण तेथे कोरोना रूग्णांची तपासणी करताना वैद्यकीय स्टाफचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच हॉस्पिटलमध्ये येणाऱयांतही भीतीचे वातावरण होते. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी इचलकरंजीतील उद्योजक प्रतिक चौगुले यांच्यासमोर सॅनिटनायझर चेंबर अन् स्वॅब केबिनची संकल्पना मांडली अन् दोन दिवसांत ती अस्तित्वात आली. सॅनिटनायझर चेंबर अन् स्वॅब मशिनचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
सीपीआरमध्ये उभारलेले सॅनिटनायझर चेंबर कायमस्वरूपी राहणार आहे. इचलकरंजी आणि गडहिंग्लज येथील रूग्णालयात उभारलेली सॅनिटनायझर चेंबर तात्पुरती आहेत. या चेंबरमध्ये सध्या सॅनिटनायझेशनचा वापर केला आहे. पण चार दिवसांत 132 डिग्रीचे स्टीम जनरेटर त्यात वापरले जाणार आहे. त्यामुळे वाफेद्वारेच व्यक्ती निजर्तुंक होऊन बाहेर पडणार आहे. या प्रयोगासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे सहकार्य लाभल्याचे उद्योजक चौगुले यांनी सांगितले.
दक्षिण कोरियानंतर कोल्हापुरात प्रथमच स्वॅब केबीन
सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये संशयित रूग्णाचा स्वॅब घेताना वैद्यकीय अधिकाऱयांना पीपीई किटचा वापर करावा लागतो. तरीही संसर्गाचा धोका राहतो. त्यामुळे स्वॅब केबिन बनवली आहे. केबिनमधून डॉक्टर स्वॅब घेणार आहे. बाहेर संशयित रूग्ण उभा राहणार आहे. डॉक्टर ग्लोव्ह वापरलेल्या हातांनी खिडकीतून केबिनसमोर उभारलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेणार आहेत. त्यामुळे शरीराच्या अन्य भागांना होणारा संसर्ग टाळला जाणार आह. तसेच सतत पर्सनल प्रेटेक्शन इक्विपमेंट बदलण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे. दक्षिण कोरियात स्वॅब मशिनची संकल्पना सर्वप्रथम राबवली होती. त्यामुळे तेथे ही साथ नियंत्रणात आणण्यात यश आल्याची माहिती प्रतिक चौगुले यांनी दिली. दरम्यान, रोज या दोन्ही केबिनचे रोज निजर्तुंकीकरण केले जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. ही संकल्पना सीपीआर हॉस्पिटलमध्ये प्रथम साकारली आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोल्हापूर बी बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते व्यापारी असोशिएशनच्यावतीने अधिकारी, कर्मचाऱयांसाठी सॅनिटायझर चेंबर उभारले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. वसंत देशमुख, डॉ. उल्हास मिसाळ, असोशिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, विकास कदम, सागर खाडे, अशोक श्रीनाळ, शिवराज पाटील, विनय पाटील आदी उपस्थित होते.