प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सोमवारी पहाटे स्फोट झाला, या घटनेत तिघा कोरोना रूग्णांचा अन्यत्र हलवताना मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही समिती बुधवारी सकाळी सीपीआरमधील ट्रॉमा केअर सेंटरला भेट देणार आहे. समितीतील बायो इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनिअर प्रत्यक्ष पाहणी करून नोंदी घेणार आहेत. त्यानंतर समितीची पहिली बैठक गुरूवारी होण्याची शक्यता आहे.
`सीपीआर’मधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सोमवारी पहाटे स्फोट झाला. यावेळी वॉर्डमधील 15 रूग्णांना अन्यत्र हलवण्यात आले. या दरम्यान, उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले तीनही रूग्ण हायरिस्क कोरोना होते. त्यांच्या फुफुस्सांत मोठÎा प्रमाणात संसर्ग झाला होता, त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सात सदस्यीय चौकशी समिती नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी फिजिशियन डॉ. बी. वाय. माळी यांच्या नेतृत्वाखाली सात जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, इलेक्ट्रिकल अभियंता, बायो अभियंता आणि अन्य तिघांचा समावेश आहे. या समितीला मंगळवारी चौकशीचे आदेश मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
चौकशी समितीने घटनेशी निगडीत कागदपत्रे सीपीआरकडून मागवली आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता समिती सदस्य ट्रॉमा केअर सेंटरला भेट देणार आहेत. यावेळी बायो इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर स्फोट झालेल्या खोलीतील साहित्याची पाहणी करून माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर गुरूवारी चौकशी समितीची पहिली बैठक होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.