वृत्तसंस्था/ टरोबा
कर्णधार पोलार्डची भेदक गोलंदाजी तसेच सिमन्स आणि डरेन ब्रॅव्हो यांच्या षटकारांच्या आतषबाजीने गुरूवारी येथे ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने हिरो पुरस्कृत कॅरेबियन प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत ट्रिनबॅगोने सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत आपले सर्व सामने जिंकून अजिंक्यपद पटकाविण्याचा नवा इतिहास घडविला. अंतिम सामन्यात ट्रिनबॅगो संघाने सेंट लुसिया झोयुक्सचा 8 गडय़ांनी पराभव केला.
या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट लुसियाने 19.1 षटकात सर्वबाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर ट्रिनबॅगो संघाने 2 गडय़ांच्या मोबदल्यात 11 चेंडू बाकी ठेवून जेतेपद पटकाविले. सिमन्स आणि ब्रॅव्हो यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 138 धावांची भागिदारी केली. सिमन्सने 49 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 84 तर डरेन ब्रॅव्होने 47 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 58 धावा झोडपल्या. या जोडीने एकूण 10 षटकार आणि 10 चौकार ठोकले. या अंतिम 11 खेळाडूत ट्रिनबॅगोने सुनील नरेनला वगळले होते. ट्रिनबॅगोच्या डावातील 17 वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. ट्रिनबॅगोला 24 चेंडूत विजयासाठी 41 धावांची जरूरी होती. पण अफगाणचा फिरकी गोलंदाज झहिर खानच्या या षटकात ट्रिनबॅगोने 23 धावा झोडपल्या. सिमन्सने 1 षटकार तर ब्रॅव्होने 2 उत्तुंग षटकार ठोकल्याने ट्रिनबॅगोला विजयासाठी 18 चेंडुत 18 धावा जरूरीच्या होत्या. त्यानंतर कुगेलीनच्या षटकात सिमन्सने 1 षटकार आणि 1 चौकार ठोकला. या षटकात ट्रिनबॅगोने 16 धावा घेतल्या.
तत्पूर्वी सेंट लुसियाच्या डावामध्ये ट्रिनबॅगोचा कर्णधार पोलार्डने भेदक गोलंदाजी करताना 30 धावात 4 गडी बाद केले. फवादने 22 धावात 2 तर अली खानने 25 धावात 2 आणि हुसेनने 26 धावात 1 गडी बाद केला. सेंट लुसियाची एकवेळ स्थिती 1 बाद 77 अशी भक्कम होती. मार्क डेयालने 27 चेंडूत 29, फ्लेचरने 27 चेंडूत 39 आणि रॉस्टन चेसने 14 चेंडूत 22 धावा जमविल्या पण त्यानंतर सेंट लुसियाचा डाव गडगडला. सेंट लुसियाचे शेवटचे सहा गडी 39 धावांच्या मोबदल्यात 6 षटकात बाद झाले.
संक्षिप्त धावफलक – सेंट लुसिया 19.1 षटकात सर्वबाद 154 (फ्लेचर 39, डेयाल 29. चेस 22, नजिबुल्ला 24, पोलार्ड 4-30, फवाद 2-22, अली खान 2-25, हुसेन 1-26), ट्रिनबॅगो नाईट रायडर्स 17.5 षटकात 2 बाद 157 (सिमन्स नाबाद 84, डरेन ब्रॅव्हो नाबाद 58, चेस 1-13, कुगेलीन 1-30).