ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाइट ccbseresults.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी cbse.nic.in या सीबीएसईच्या मुख्य संकेतस्थळावरही निकाल पाहू शकतात.
सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात यंदा 91.46 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा पास केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 0.36 टक्क्यांनी यंदा निकाल वाढला आहे. नेहमप्रमाणेच यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 93.31 टक्के मुली पास झाल्या आहेत. 90.14 टक्के मुलं पास झाली आहेत.
- पुणे विभाग टॉप 5 मध्ये
सीबीएसई बोर्डाचा महाराष्ट्राचा निकाल 98 टक्के लागला. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजेच 99.28 टक्के लागला. दुसऱ्या स्थानावर चेन्नई विभाग असून 98.95 टक्के तर तिसऱ्या स्थानी बेंगळूर 98.23 टक्के तर चौथ्या स्थानी पुणे विभाग असून 98.5 टक्के निकाल लागला आहे.
यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत माहिती दिली.तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मी पुन्हा सांगतो, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमचे प्राधान्य देऊ, असे निशंक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
कोव्हिड-19 मुळे यंदा गुणवत्ता यादी किंवा मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही. असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थी आपला निकाल एसएमएसद्वारे देखील पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून आपला रोल नंबर 7738299899 या नंबरला मेसेज करून पाठवायचा आहे त्यानंतर बोर्डाकडून त्यांना निकाल पाठवला जाईल.
यासाठी विद्यार्थ्यांना CBSC10 (आपला रोल नं) (ॲडमिट कार्ड आय डी) अशा प्रकारे लिहून CBSC च्या वरील नंबरवर मेसेज पाठवायचा आहे.