26 एप्रिलपासून प्रारंभ : दोन पेपर्समध्ये तयारीसाठी पुरेसा वेळ उपलब्ध
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म-2 च्या परीक्षांचे पेपर्स 26 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले असून अधिकृत वेबसाईटवर किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, प्रवेशपत्रे फक्त शाळांमध्येच दिली जाणार आहेत. यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू होईल. यासह शिफ्टदेखील एकसमान ठेवण्यात आली आहे. म्हणजेच मुलांना दोन शिफ्टमध्ये परीक्षेला जावे लागणार नाही.
दहावीची परीक्षा 24 मे रोजी संपणार असून बारावीची परीक्षा 15 जून रोजी संपणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना जेईई मेनसह इतर स्पर्धात्मक परीक्षांचीही काळजी घेण्यात आली आहे. या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. भारताव्यतिरिक्त आणखी 26 देशांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनामुळे 2021-2022 हे शैक्षणिक वर्ष दोन टर्ममध्ये विभागण्यात आले आहे. तसेच अभ्यासक्रमाचेही दोन भाग करण्यात आले आहेत.