वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2021 मध्ये होणाऱया सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा 31 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून शनिवारी यासंबंधीची माहिती दिली आहे. येत्या गुरुवारी सायंकाळी 6 वाजता परीक्षांच्या वेळापत्रकांची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे किमान जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. सद्यःस्थितीत जानेवारी आणि फेब्रुवारीत परीक्षा आयोजित करणे शक्य नाही. मार्चच्या तारखांसाठी स्थितीचे आकलन केले जात आहे. परीक्षांच्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील, असे ते म्हणाले होते. तसेच विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. 2021 च्या बोर्ड परीक्षेसाठी सीबीएसईने अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी केला आहे.
सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या आयोजनावरून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांदरम्यान विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. कोविडमुळे आतापर्यंत देशातील शाळा-महाविद्यालये पूर्णपणे सुरू झालेली नाहीत. बोर्ड परीक्षांच्या नोंदणीपासून वर्ग संचालनापर्यंत सर्व कार्ये ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.