कामाला प्रारंभ होऊन दोन वर्षे उलटली : अद्यापही निम्मे काम शिल्लक
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत सीबीटी बसस्थानकाचा विकास साधण्यात येत आहे. या कामाला सुरुवात होऊन 2 वर्षे उलटली तरीदेखील अद्याप निम्मे काम शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित बसस्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी अजूनही 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
या स्मार्ट बसस्थानकाचे काम 2019 ला हाती घेण्यात आले होते. तब्बल 102 कोटीचा निधी खर्ची घालण्यात येत आहे. मात्र, कोरोना व इतर अडचणींमुळे बसस्थानकाचे काम बऱयाच काळासाठी रखडले आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप निम्मे काम शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी कॅन्टोन्मेंट बोर्डने परवानगी नाकारल्याने काही काळाकरिता काम बंद राहिले होते. त्यानंतर गतवषी कोरोनाचा फैलाव वाढल्याने परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परतल्याने कामाला स्थगिती मिळाली होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र, काम संथगतीने सुरू असल्याने अद्याप बराच कालावधी लागण्याची चिंताही व्यक्त होत आहे. सध्या सीबीटी बसस्थानकाच्या तळमजल्यावरील स्लॅब भरणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकातील पादचाऱयांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी सीबीटी बसस्थानकाचे काम रखडले आहे. परिणामी बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरत आहे.
ठेकेदाराचे दुर्लक्ष
स्मार्ट बसस्थानकाच्या कामासाठी बसस्थानकात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या ठिकाणी सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना प्रवाशांना अधिक करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना खुले करावे, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बसस्थानकाला भेट देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची ठेकेदाराला सूचना केली होती. मात्र, अद्याप ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.