तळमजल्यावरील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार : महापालिकेच्या अधिकाऱयांकडून माहिती उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगून गाळे रिकामे करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याच व्यापारी संकुलातील 9 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महानगरपालिकेने लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, दुरुस्तीचे काम रद्द करण्यात आले का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
सीबीटीसमोरील व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील इमारतीमध्ये गळती लागली आहे. छताचा गिलावा कोसळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पहिला मजला हटवून पुन्हा नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. याकरिता येथील गाळेधारकांना रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती. भाडे कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांना हटविण्यात आले आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्यात येणार होते. पण अद्याप हस्तांतराची प्रक्रिया झाली नाही. मात्र, याच दरम्यान या व्यापारी संकुलातील रिकामी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजिली आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम करण्याचे व दुरुस्तीचे काम रद्द करण्यात आले का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. गाळे रिकामी करण्यासाठी दुरुस्ती करण्याचे नाटक महापालिकेच्या महसूल विभागाने केले असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. व्यापारी संकुलातील 9 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी येत्या 12 जानेवारी रोजी लिलाव प्रक्रिया आयोजिली आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता सदर गाळे तळमजल्यावर असून, नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये चार गाळे रिकामी आहेत. मागील बाजूस असलेल्या जुन्या इमारतीमध्ये 5 गाळे रिकामी आहेत. त्यामुळे सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावरील इमारतीचा भाग हटवून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे ते गाळे किंवा येथील हॉल भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्यास दोन दिवस व्यावसायिकांना दुकाने बंद करावी लागतील. पण तळमजल्यावरील व्यावसायिकांना दुरुस्तीच्या कामाची कोणतीच अडचण नाही. त्यामुळे तळमजल्यावरील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.