विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला दिले प्राधान्य
मास्क लावून विद्यार्थ्यांनी दिला पेपर
परीक्षा केंद्रावर स्वयंसेवकांची टीम
प्रतिनिधी / बांदा:
सीमा भागातून गोव्यात शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गातील पाच परीक्षा केंद्रावर शनिवारपासून सुरू झाली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा शासनाच्या नियामांचे पालक करीत झाली. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. या केंद्रावर एकूण 197 विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती गोवा शिक्षण मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिली. सॅनिटाईज प्रश्नपत्रिका, सोशल डिस्टन्सिंगने सॅनिटाईजचा वापर करीत वर्गात प्रवेश, वर्गात सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
सातार्डा केंद्रावर 71, आरोंदा 17, भेडशी 61, आयी 24 व चोर्ला केंद्रावर 24 असे एकूण 197 सिंधुदुर्गचे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करुनच परीक्षागृहात प्रवेश देण्यात आला. शिवाय सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस व स्वयंसेवक यांची टीम कार्यरत आहे.
सातार्डा प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल केंद्रावर एकूण 71 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. केंद्रप्रमुख म्हणून आरोस विद्याविहार ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सुषमा प्रवीण मांजरेकर काम पाहत आहेत. शिस्तबद्ध नियोजन व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला देण्यात आलेल्या प्राधान्यामुळे पालकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, पोलीस, पर्यवेक्षक अशी 20 जणांची टीम या केंद्रावर कार्यरत असल्याचे सौ. मांजरेकर यांनी सांगितले. परीक्षा केंद्राला गोवा बोर्ड व्हीजिटीअर ऑफिसर धुरी, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्गा साळगावकर, सातार्डा सरपंच भरत मयेकर, पोलीस पाटील सौ. विनिता मयेकर, आरोग्य सेवक खेडकर आदींनी भेट दिली.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सातार्डा इंग्लिश मीडीयम स्कूल कमिटी अध्यक्ष उदय परिपत्ये, सरपंच मयेकर, युवा कार्यकर्ते सागर प्रभू, योगेश गोवेकर, ग्रा. पं. सदस्य सागर राऊळ, विलास राऊळ, सुधा कवठणकर, काशिनाथ केरकर, पत्रकार परशुराम मांजरेकर, गणेश सातार्डेकर, सुशिल गोवेकर, सुधाकर वेंगुर्लेकर, आना आरोलकर, हर्षद पेडणेकर, श्रीकांत जाधव, होमगार्ड मिथीलेश नागवेकर यांची टीम कार्यरत आहे. यावेळी डॉ. स्मिता शेलटे- नाईक यांनी विद्यार्थ्यांना अर्सेनिक गोळय़ा व मास्कचे मोफत वाटप केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.
भेडशी केंद्रावर 63 विद्यार्थी
साटेली भेडशी : गोवा राज्यात शिक्षण घेत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे शनिवारपासून सुरू झाली. या परीक्षा केंद्रावर 63 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यावेळी परीक्षा केंद्र संचालक प्रा. गजानन मराठे, न्यू इंग्लिश स्कूल भेडशीच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यवस्थापन केले.