शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचे आवाहन
पहिला आवाज शिवसेनेचा उठतो. आजवर म. ए. समितीच्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना अग्रभागी राहिली आहे. युवा पिढीदेखील आता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आंदोलनात भाग घेत आहे. येणाऱया विधानसभेच्या निवडणुकीत नव्या उमेदीने सीमाभागात पुन्हा भगवा फडकावा, शिवसेनेचे पाठबळ नेहमी तुमच्या सोबत असेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
शनिवारी राजेश क्षीरसागर यांनी रामलिंगखिंड गल्ली येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला धावती भेट दिली. धर्मवीर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते बेळगावमध्ये आले होते. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नरेश पाटील, तालुका प्रमुख सचिन गोरले उपस्थित होते.
आनंद दिघेंचे कार्य बेळगावकरांना दाखविणार
ठाण्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. महाराष्ट्रभर याचे प्रदर्शन होत असताना बेळगावमध्ये ही या चित्रपटाचे प्रमोशन व्हावे व बेळगावकरांना हा चित्रपट पाहता यावा, यासाठी रविवार ते गुरुवार सीमावासियांना मोफत चित्रपट दाखविला जाणार आहे. आनंद दिघे यांचे कार्य प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्यांना माहिती व्हावे, यासाठी हा प्रयत्न आहे. सीमावासियांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ही क्षीरसागर यांनी केले.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी राजेश क्षीरसागर यांचा भव्य सत्कार केला. शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, नरेश पाटील, सचिन गोरले यांनी सीमावासियांची कैफियत त्यांच्या समोर मांडली. यावेळी युवा सेनेचे विनायक गुंजी, वैभव कामत, अद्वैत चव्हाण-पाटील, चेतन गंगधर, सिद्धार्थ चौगुले, श्रीकांत कदम, किसन सुंठकर व इतर उपस्थित होते.
वैभव नाईक यांनी काळय़ा दिनाला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन
कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी दुपारी शिवसेना कार्यालयाला भेट दिली. येथील मराठी माणसाच्या भावना तीव्र आहेत. या भावनांची कदर करत येत्या काळय़ा दिनाच्या मूक फेरीला आपण उपस्थित राहणार आहोत. तसेच सीमाभागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.