काबूल विमानतळावरील गर्दी ओसरली- दहशतीमुळे दुकाने अद्याप बंद
अमेरिकेने काबूल विमानतळावरील नियंत्रण सोडताच तालिबानने विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला. काबूलच्या रस्त्यांवर तालिबानी दहशतवादी रात्रभर गोळीबार करत राहिले. याचबरोबर मागील 15 दिवसांपासून आशेचा सर्वात मोठा किरण ठरलेले काबूल विमानतळ आता ओस पडले आहे. केवळ तालिबानी दहशतवादीच या विमानतळात दिसून येत आहेत.
देश सोडण्यासाठी अफगाण नागरिक आता सीमावर्ती भागांच्या दिशेने धाव घेऊ लागले आहेत. अमेरिकेने काढता पाय घेतल्यावर लोकांनी दुकाने आणि बाजारांपासून अंतर राखले आहे. रस्त्यांवर तालिबानी दहशतवाद्यांशिवाय फारच कमी लोक दिसून आले.
अफगाणिस्तानात अडकून पडलेले अफगाण कमांडो आणि अन्य लोकांना वाचविण्यासाठी नाटोचे निवृत्त आणि काही सक्रीय सैनिक थांबले आहेत. या टास्क फोर्सचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) स्कॉट मान यांनी आता आम्ही लोकांना हवाई मार्गाऐवजी रस्तेमार्गाने बाहेर काढत आहोत असे सांगितले आहे. काही दिवसांमध्ये आम्ही 700 ते 750 लोकांना रस्ते तसेच जलमार्गातून बाहेर काढल्याची माहिती त्यांनी दिली आहे.