मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार प्रकाशन
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा व यासंबंधित ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद-संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दि. 27 रोजी मुंबई येथील सहय़ाद्री अतिथीगृहात होणार आहे. दुपारी 12.30 वा. हा कार्यक्रम होणार असून माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राच्या सीमाकक्षाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगावमधील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार शरद पवार यांची भेट घेऊन सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील घडामोडींवर चर्चा होणार आहे. मुंबई येथील कार्यक्रमाला महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभा लोढा उपस्थित राहणार आहेत.