शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आवाहन : मुतगे येथे जल्लोषी स्वागत
वार्ताहर / सांबरा
शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांचे बुधवारी मुतगे येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला आले होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांचे सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर बेळगावकडे जाताना त्यांचे मुतगे येथे स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या वाहनांचा ताफा गावात दाखल होताच फटाक्मयांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खासदार संजय राऊत व खासदार धैर्यशील माने यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, समितीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे मी येथे शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी आलो आहे. कर्नाटक शासनाकडून नेहमीच सीमाभागातील लोकांवर दडपशाही सुरू आहे. ही दडपशाही विरोधातील लढाई असून अशा लढाया लढतच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आता या लढाईचे सूत्र तरुण पिढीने हातात घेतले आहे. युवा पिढीच्या एकीची वज्रमूठ पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. येथील युवकांची संख्या पाहता शुभम शेळके यांचा विजय हा निश्चित आहे. सीमावासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवा, तसेच आपण एक आहोत ही दाखविण्याची संधी चालून आली आहे. यासाठी सीमावासियांनी मोठय़ा संख्येने एकत्र या, असे आवाहन केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष भालचंद्र पाटील, ता. प. सदस्य सुनील अष्टेकर, काशिनाथ धर्माजी, वसंत सुतार, ग्रा. पं. सदस्य सुधीर पाटील, किरण पाटील, संजय पाटील, सदस्या बबिता पाटील, लक्ष्मी पाटील, भाग्यश्री पाटील, भाऊराव जाधव, मनोहर कडेमनी, मनोहर पाटील, नारायण कणबरकर, नारायण गोमानाचे, बसवंत हलगेकर, पिराजी पालकर, मारुती जत्राटी, शिवाजी जोगाणीसह सांबरा, मुतगा, निलजी, बाळेकुंद्री खुर्द, बसवन कुडची गावातील नागरिक उपस्थित होते.