महाराष्ट्राचे माजीमंत्री भरमू पाटील यांची ग्वाही : लक्ष्मण लाळगे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ
वार्ताहर /उचगाव
महाराष्ट्र नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात सीमाप्रश्नाला वाचा फोडण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले आहे. चंदगड तालुक्मयातील तमाम जनता सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, याची ग्वाही मी देतो. सीमाभागातील जनतेने केव्हाही आम्हाला हाक द्यावी. त्यांच्या मदतीला आम्ही सदैव धावून येऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी दिली.
हुतात्मा परशराम लाळगे यांचे बंधू लक्ष्मण लाळगे यांच्या शिक्षकी पेशातून निवृत्तीनिमित्त मळेकरणी देवीच्या प्रांगणात रविवारी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भरमू पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे नेते बी. एस. होनगेकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमू पाटील, प्रकाश मरगाळे, ता. पं. माजी सदस्य एस. एल. चौगुले, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, समितीचे नेते आर. आय. पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार मनोहर किणेकर, उचगाव ग्रा.पं अध्यक्ष जावेद जमादार व्यासपीठावर उपस्थित होते.