कोल्हापूर/ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज की जय….,बेळगाव आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाचं…, सीमावासीय मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध असो…, बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे…,अशा घोषणा देत कर्नाटक सरकारविरोधात शिवसेनतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.
सीमाबांधव दरवर्षी 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. या निमित्त सीमाभागातील मराठी बांधवांनी रॅलीची परवानगी मागितली होती. परंतु कर्नाटक सरकारने नाकारली. त्याचा निषेध करण्यासाठी व काळा दिन साजरा करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथे एकत्र आले. या ठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागात 1 नोव्हेंबरला काळा दिवस साजरा केला जात आहे. त्या निमित्त सीमा भागातील बांधवांकडून नियोजित रॅलीला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. त्याबाबत जिल्हा शिवसेनेतर्फे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येत आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसह तेथील मराठी पाट्यांवर अन्याय सुरु आहे. त्याबद्दल गेले महिनाभर जनआंदोलन सुरु आहे. अजूनही बेळगाव महापालिकेसमोर लाल व पिवळा झेंडा दडपशाही पध्दतीने उभा केला जातो. या महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. मराठी माणसाला चेपविण्याचा प्रयत्न महापालिका व सरकारकडून सुरु आहे. याचा निषेध करुन शिवसेना हा काळा दिवस साजरा करत आहे
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज दडपूण त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. मराठी भाषेतील पाट्या लावू दिल्या जात नाहीत. सर्वच स्तरावर सीमाभागातील मराठा बांधवांना लक्ष केले जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. शिवसेना कायमच सीमावासीयांच्या पाठीशी आहे. भविष्यात कोल्हापूर जिह्यात जिथे-जिथे कन्नड पाटी दिसतील ती दुकाने बंद करण्याची कारवाई प्रशासनाने करावी, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने ती बंद करेल.
आंदोलनात सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, राजू जाधव, राजेंद्र पाटील, अवधूत साळोखे, विनोद खोत, सरदार तिप्पे, मंजित माने, गणेश सुतार, नरेश तुळशीकर, योगेंद्र माने, प्रवीण पालव, अभिजीत बुकशेठ, जीवन पाटील, धनाजी यादव, शुभांगी पोवार, उत्कर्षा रेळेकर, प्रीती क्षीरसागर, शुभांगी साळोखे, स्मिता सावंत, गीतांजली ठुमके, सुधा पाटील, पुजा शिंदे, दिपाली शिंदे आदी सहभागी झाले होते.