सैन्यप्रमुख नरवणे यांचे चीनसोबतच्या तणावासंबंधी विधान : अफगाणिस्तानातील स्थितीवर बारीक नजर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात सीमा विषयक करार होत नाही, तोवर दोन्ही देशांदरम्यान सीमेवर वाद होत राहणार असल्याचे सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकंद नरवणे यांनी गुरुवारी म्हटले आहे. सैन्यप्रमुखांनी पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना अफगाणिस्तानातातील घडामोडींवर भारतीय सैन्य नजर ठेवून होते आणि तेथील स्थिती पाहून सैन्य रणनीति तयार करत असल्याचे नमूद केले आहे.
भारताचा चीनसोबत अद्याप सीमा वाद सुरू आहे. आम्ही कुठल्याही दुस्साहसाचा सामना करण्यासाठी पुन्हा तयार आहोत. एक दीर्घकालीन तडजोड होत नाही तोवर अशाप्रकारच्या घटना घडत राहणार आहेत. दीर्घकालीन तडजोड म्हणजेच सीमा विषयक करार व्हावा लागेल. दोन्ही देशांना सीमेवर शांतता राखण्यासाठी एक मजबूत प्रयत्न करावा लागणार असल्याचे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे.
स्थितीचा वारंवार आढावा
भारतीय सैन्य किंवा सशस्त्र दल विविध धोक्यांचे वेळोवेळी मूल्यांकन करत असतात. त्या मूल्यांकनाच्या आधारावर भारतीय सैन्य भविष्यातील धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक रणनीति आणि व्यूहनीति आखत असते. ही एक निरंतर प्रक्रिया असून जी कधीच थांबत नाही. 15 ऑगस्ट रोजी काबूल तालिबानच्या कब्जात गेले होते. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण किंवा वित्तपुरवठय़ासाठी केला जाऊ नये, असे भारताने स्पष्ट केले आहे. भारतीय सैन्य सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तयार असल्याचे नरवणे यांनी म्हटले आहे.
काश्मीरमध्ये सतर्क
जम्मू-काश्मीरमध्ये आमच्याकडे एक अत्यंत वेगवान दहशतवादविरोधी ग्रिड आहे. ही वेगवान ग्रिड पाकिस्तानकडून अधिकाधिक दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर नजर ठेवून आहे. स्थितीतील उतार-चढावांच्या आधारावर आम्ही आमच्या संचालनाच्या स्तराचेही वारंवार मूल्यांकन करत असतो, असे सैन्यप्रमुख म्हणाले.
मागील वर्षी हिंसक झटापट
भारत आणि चीन सैन्यादरम्यान मागील वर्षी मे महिन्यात पँगोंग सरोवर क्षेत्रात हिंसक झटापट झाल्यावर सीमेवर तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांनी हजारो सैनिकांना तैनात करण्यासह मोठी शस्त्रास्त्र देखील सीमेवर आणली होती. गलवान खोऱयातील हिंसक झटापटीत भारताचे काही सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचे सैनिक मारले गेले होते, पण चीनने अद्याप याची कबुली दिलेली नाही.