प्रतिनिधी, बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली झाली आहे. त्यामुळे रिक्तझालेल्या पदावर चिकोडीचे एएसपी जी. के. मिथूनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी रात्री बदलीचा हा आदेश जारी करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री हंपीच्या एएसपी सीमी मरीयम जॉर्ज यांची नियुक्ती बेळगावच्या पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली होती. राज्य सरकारने केवळ 24 तासांत आधीचा आदेश रद्द करुन गुरुवारी रात्री तीन आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्यांचा आदेश जारी केला असून नव्या आदेशात बेळगावला मिथूनकुमार यांची वर्णी लावण्यात आली आहे.
नव्या आदेशात सीमी मरीयम यांची बदली बेंगळूरला करण्यात आली आहे. मिथूनकुमार हे 2016 बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या चिकोडीचे एसीपी म्हणून ते सेवा बजावत आहेत. केवळ 24 तासांत बदल्यांचा आदेश कार रद्द झाला? याचा उलगडा झाला नाही.
सीमा लाटकर यांनी तब्बल अडीच वर्षे कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून उत्तमरित्या सेवा बजावली आहे. विधीमंडळ अधिवेशन, गणेशोत्सव, शिवजयंती मिरवणुक बंदोबस्तासह दोन वर्षांपूर्वी झालेल्या जातीय दंगली रोखण्यासाठीही त्यांनी प्रामाणिकपणे ठोस उपाययोजना राबविल्या होत्या. पोलीस दलातील गटबाजीचा बिमोड करत त्यांनी जनतेच्या सेवेवर भर दिला होता व आपला वेगळा ठसा उमटविला होता.
चौकट करणे
पोलीस अधिकाऱयांनाही बसला होता हादरा
सीमा लाटकर यांनी कुदेमनी येथील जुगारी अड्डय़ावर छापा टाकला. या कारवाईने अनेक पोलीस अधिकाऱयांनाही हादरा बसला होता. कारण काही पोलीस अधिकाऱयांनी हात मिळवणी करुनच तो अड्डा चालविण्यास मुभा दिली होती. तरीही त्यांनी धाडसाने कारवाई केली होती. त्यावेळी जुगारी अड्डय़ांमुळे ज्यांचे खिसे गरम व्हायचे तशा अधिकाऱयांनी त्यांच्या विरुध्द शंखनाद सुरु केला होता.