पोलिसांच्या लॉकडाऊनबाबत प्रश्नचिन्ह : राजरोस वाहतूक व विक्रीही?
प्रतिनिधी / कुडाळ:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गोव्यातून येणाऱया सर्व रस्त्यांच्या सीमा सिंधुदुर्ग पोलिसांनी सील केलेल्या असतानाही सिंधुदुर्गातील कुडाळ, वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील बहुतांशी गावात राजरोसपणे गोवा बनावटीची दारू येते कशी? व तिची राजरोस विक्री होते कशी?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांच्या लॉकडाऊनबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सिंधुदुर्गात वाढू नये, यासाठी लॉकडाऊन करणे अत्यावश्यक असून तशाप्रकारे व्यूहरचना पोलीस यंत्रणेने केली आहे. सर्व शहरात बंदोबस्त ठेवून दुचाकी रस्त्यावर आणायला दिली जात नाही. कर्फ्यूची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेने कोरोनाच्या संकटातून सिंधुदुर्ग सुरक्षित कसा राहील? हे पाहिले.
मात्र, सर्वसामान्यांना काही तातडीच्या कामाला दुचाकी व अन्य वाहने वापरास बंदी घालताना कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी या तालुक्यात बहुतांशी ठिकाणी गोवा बनावटीची दारू येत असून त्याची विक्रीही होत आहे. दारुच्या बेकायदा वाहतूक व विक्रीमुळे मद्यपींची ‘सोय’ होत आहे. स्वस्त व जेथे आवश्यक तेथे ही दारू मिळत असल्याने पोलिसांच्या कर्फ्यूला गालबोट लागत आहे.
कुडाळ शहरासह पिंगुळी व अन्य महत्वाच्या गावात ही दारू कार व दुचाकीवरुन सहीसलामत पोहचविली जात आहे. तसेच दारू चक्क मोक्याच्या ठिकाणी विकली जाते. मग ही दारू येते कशी?, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दारुचा साठा करण्यात आला का?
गोव्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या, असे पोलीस यंत्रणा सांगते. मग दारुच्या गाडय़ा सोडल्या जातात का? की सिंधुदुर्गातच गोवा बनावटीच्या बेकायदा दारुचा मोठा साठा केलेला आहे. तिथून ही दारू गावोगावी मधल्या मार्गाने पोहोच केली जाते का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अनेक तरुण व्यसनाधीन
स्वस्त व कुठेही दारू मिळू लागल्याने अनेक तरुण दारुच्या व्यसनात अडकले असून दारु नसेल, तर ते राहू शकत नाहीत. त्यामुळे चोरी-हाणामारीचे प्रकारही वाढीस लागले आहेत.