प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात प्रवेश करणाऱया प्रत्येकाला कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असतानाही जिल्हाधिकाऱयांनी त्यात सूट कशी काय दिली? असा सवाल करुन न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. वैद्यकीय प्रश्नावरुन किंवा रुग्णवाहिकेतून गोव्यात येणाऱयांनाच फक्त सूट असेल, इतर सर्वांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करणारी नवी अधिसूचना संध्याकाळपर्यंत नव्याने जारी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
दि. 6 मे 2021 रोजी अंतरिम निवाडा देताना उच्च न्यायालयाने कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती केली होती. दि. 8 मे रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी अधिसूचना जारी करुन कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती 10 मे पासून लागू केली, मात्र कामानिमित्त जे गोव्यात येतात किंवा ज्यांनी कोविड लसचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती नसल्याचे त्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले होते.
दि. 9 मे 2021 रोजी जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांनी नवा आदेश जारी केला. त्यात वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी पुरावा सादर केल्यास किंवा जे रुग्णवाहिकेतून प्रवेश करतात त्यांना सूट देण्याची नवी अधिसूचना जारी करण्यात आली.
वैद्यकीय सुविधांसाठी पुरावा सादर करुन किंवा रुग्णवाहिकेतून गोव्यात प्रवेश करणाऱयांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रात सूट देण्यात आली हे समजून घेतले जाऊ शकते. पण इतरांना सूट देण्यामागचे कारण न्यायालयाने विचारले तेव्हा ऍडव्होकेट जनरलनीही जिल्हाधिकाऱयांच्या या कृतीचे समर्थन केले नाही. संध्याकाळपर्यंत नव्याने आदेश जारी करुन न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान केला जाईल, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. संध्याकाळपर्यंत दुरुस्ती आदेश जारी करण्याची सूचना यावेळी न्यायालयाने दिली.
जीवनावश्यक मालवाहू वाहनचालकांना सूट
गोव्यात ऑक्सिजन टँकर, औषधे तसेच फार्मासीसाठी कच्चा माल पुरवणारी वाहने, इंधन, भाजी, कडधान्ये, अंडी, मांस, स्वयंपाक गॅस, वैद्यकीय उपकरणे घेऊन येणाऱया वाहनांच्या चालकांना व वाहकांना 12 मेपर्यंत सूट देण्यात आली आहे. अशा वाहनांवर किती व्यक्ती असाव्यात, यावर प्रशासनाने विचार करावा असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करुन आरोग्य सचिवांनी सादर केलेल्या या पुरवणी याचिकेवरील सुनावणी आज बुधवार दि. 12 मे रोजी ठेवली आहे.