ऑनलाईन टीम / पुणे :
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सीरमकडून कोविशिल्ड लसीचे दर बुधवारी जाहीर करण्यात आले आहेत. अन्य देशांतील लसीपेक्षा कोविशिल्डचे दर कमी राहतील याची काळजीही सीरमने घेतली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील ट्विट करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पूरक असे काही निर्णयही घेण्यात आले आहेत. त्याला अनुसरून सीरमनेही पुढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या काळात निर्माण होणाऱ्या लसीपैकी 50 टक्के लस भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पुरवली जाणार आहे. तर उर्वरीत 50 टक्के लस राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना दिले जातील, असे सीरमने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस 400 रुपये मोजावे लागतील तर, खासगी रुग्णालयांना लसीचा एक डोस 600 रुपयांना पडणार आहे. अमेरिका, रशिया व चीनमधील लसीच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त असल्याचे सीरमने म्हटले आहे. भारताबाहेरील लसीचे खुल्या बाजारातील दरही पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.
- अमेरिकी लसीचा दर : 1500 रुपये प्रति डोस
- रुसी लसीचा दर : 750 रुपये प्रति डोस
- चिनी लसीचा दर : 750 रुपये प्रति डोस