समुद्रकिनाऱयावरील गॅलरी आज पाडणार,
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर शहराला लाभलेल्या 6 किलोमीटरच्या अथांग समुद्रकिनाऱयाचे दर्शन पर्यटकांना जवळून घेता यावे, समुद्रामध्ये बागडणाऱया डॉल्फीन दर्शनाचा आनंद लुटता यावा, यासाठी उभारलेल्या 3 सीव्ह्यू गॅलरींचा शनिवारी अस्त होणार आहे. जिल्हाधिकाऱयांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला गॅलरी पाडण्याचे लेखी आदेश प्राप्त झाल्याने शनिवारी गॅलरी पाडण्यास सुरूवात होणार आहे. मात्र यातून गुहागरच्या पर्यटन विकासाच्या उतरत्या आलेखाच्या नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचे पहावयास मिळणार आहे.
गुहागरच्या ग्रामपंचायतीमुळे पर्यटन विकासावर खर्च करण्यास मर्यादा येत होत्या. यामुळे तत्कालीन नगरविकास मंत्री व पालकमंत्री आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरची नगर पंचायत केली. त्यानंतर पर्यटकांना समुद्रकिनाऱयावर आल्यावर वेगळेपणे दिले तरच पर्यटन वाढेल, हे हेरून समुद्रामध्ये फ्लोटींग जेटी, सीव्ह्य़ू गॅलरी तसेच नाना-नानी पार्क, नक्षत्रवन इको टुरिझमच्या माध्यमातून साकारले होते. आज यातील सीव्ह्य़ू गॅलरी सीआरझेडची परवानगी नसल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांच्या आदेशानुसार पाडली जात आहे. जिल्हाधिकाऱयांनी गुहागरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाला गॅलरी पाडण्यासंदर्भात लेखी आदेश दिल्याने शनिवारी गॅलरी पाडण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. यासाठी पोलीस परेड मैदानावर पोकलेनही हजर झाला आहे. ही कार्यवाही करताना तहसीलदार, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपविभागीय अधिकारी चिपळूण उपस्थित राहणार आहेत. सीआरझेड अंतर्गत ही सर्वात मोठी कारवाई ठरणार आहे.
समुद्रकिनाऱयावरील सर्वच उपक्रम नष्ट
पर्यटन वाढीसाठी समुद्रकिनाऱयावर बांधण्यात आलेल्या फ्लोटींग जेटीची अवस्था तुटलेल्या स्वरूपाची आहे. या जेटीची दुरूस्ती करण्यावर पाबंदी आहे. आता सीव्ह्य़ू गॅलरी पाडण्यात येणार आहे. यापूर्वी नक्षत्रवन व नाना-नानी पार्कच्या देखभाल व दुरूस्तीसाठी प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने ती ही नष्ट झाली आहे. यामुळे गुहागरच्या समुद्रचौपाटीवर सध्यातरी कोणताच उपक्रम नाही. यातून गुहागर शहर पुन्हा 8 वर्षे मागे गेले असून गुहागरच्या पर्यटन विकासाचा उतरता आलेख सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. समुद्रकिनाऱयावरील इतर सुविधांसाठी यापुढे सीआरझेडचा सर्वात मोठा अडथळा निर्माण होणार असून असे उपक्रम उभारण्यासाठी आणखी किती कालावधी लागतो, हे कोणीही सांगू शकत नाही.
गुहागर तालुक्याए अन्य विकासाबरोबरच पर्यटन विकासाला चालना मिळून लोकांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी अनेक उपक्रम आपण राबवले. त्यापैकेच एक शहरातील सीह्यू गॅलरी व जेटी होय. तसेच एक तालुका क्रीडासंकुलही उभे करण्यात आले. काही लोकांनी गुहागरचा विकास होऊ नये, यासाठीच आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावली. आपण उभारलेल्या सीह्यू गॅलरी, जेटी व क्रीडासंकुलाबाबत गेली 8 वर्षे सातत्याने गरळ ओकत राहिले. आज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीह्यू गॅलरी तोडण्यात येणार आहे. प्रचंड मेहनत घेऊन हे कौतुकास्पद काम दुसऱयाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन करण्यात जे यशस्वी झाले त्यांचे व आपल्या खांद्यावर बंदूक ठेऊन ज्यांनी हे कृत्य करण्यामध्ये आपला खांदा पुढे केला, त्यांचे या उत्तुंग कामगिरीबद्दल अभिनंदन करतो, असे टीकास्त्र आमदार भास्कर जाधव यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली. तसेच त्यांना लवकरच समुद्रकिनारी असलेली जेटी व तालुका क्रीडासंकुल उद्ध्वस्त करण्यासाठीही आई जगदंबेने ताकद द्यावी, यश द्यावे व त्यांच्या हातून तेही पुण्यकर्म लवकरच पार पडावे, अशा शुभेच्छा देतो. गुहागर पर्यटन वाढीसाठी त्यांनी सुरू ठेवलेली त्यांची ही अशा प्रकारची कामे त्यांनी अधिकाधिक करावीत, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.
पर्यटन वाढीसाठी उपक्रम झालेच पाहिजेत
सीव्ह्य़ू गॅलरी काढून टाका, हा आदेश न्यायालयाचा आहे. यामुळे त्यावर मी काहीही बोलू शकत नाही, परंतु पर्यटन विकासासाठी समुद्रकिनाऱयावर उपक्रम झालेच पाहिजेत. यासाठी बंदर विभाग, महसूल प्रशासन यांनी सार्वजनिक उपयोगासाठी प्रत्येक उपक्रमासाठी सहकार्याची व ती उभारणीसाठी सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. आम्हीही समुद्रकिनाऱयाच्या संरक्षणासाठी व उपक्रमांसाठी विविध कामांची मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केली.