28 दिवसांमध्ये तिसऱयांदा सेवा स्थगित
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद-केवडियादरम्यान सी-प्लेन सेवेचा शुभारंभ 31 ऑक्टोबर रोजी केला होता, परंतु एक महिन्यातच ही सेवा बंद पडली आहे. सी-प्लेन दुरुस्तीसाठी शनिवारी मालदीव येथे पाठविण्यात आले आहे.
1 नोव्हेंबर पासून सर्वसामान्यांसाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्यात आली होती. या 28 दिवसांमध्ये यापूर्वीही दोनवेळा ही सेवा 3-3 दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. चालक दलाला आराम देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
50 वर्षे जुने विमान
सी-प्लेन सेवा देशात पहिल्यांदाच सुरू झाली असली तरीही यात वापरले जाणारे विमान 50 वर्षे जुने आहे. परंतु विमान उत्तम स्थितीत असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. हे सी-प्लेन सर्वाधिक सुरक्षित विमानांपैकी एक असल्याचे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने म्हटले होते.