संसदीय संरक्षण स्थायी समितीच्या सदस्यांचा समावेश : प्रकल्पस्थळी कामांची करणार पाहणी
प्रतिनिधी /कारवार
दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा व भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण म्हणून गणल्या जाणाऱया येथून जवळच्या आयएनएस कदंबा नौदल प्रकल्पाला (सीबर्ड) संसदीय संरक्षण स्थायी समितीचे सदस्य दि. 20 रोजी भेट देणार आहेत, असे सांगण्यात आले.
कारवार व अंकोला तालुक्यांच्या किनारपट्टीवर सी-बर्ड नाविक दलाचा पहिला टप्पा कोटय़वधी रुपये खर्च करून यापूर्वीच केला असून दुसऱया टप्प्यातील कामे वेगाने आकार घेत आहेत. सी-बर्ड प्रकल्पस्थळी खासदारांचे पथक कामांची पाहणी करणार आहेत, असे सांगण्यात आले.
खासदारांच्या पथकाव्यतिरिक्त संरक्षण आणि नौसेनेतील काही वरिष्ठ अधिकारी बुधवारी प्रकल्पस्थळी दाखल होणार आहेत. संसदीय संरक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष आणि खासदार ज्युवेल ओरम यांच्या नेतृत्त्वाखाली काही लोकसभा व काही राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, एआयसीसीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे. पथकामधील सदस्यांचा आकडा नेमका किती असेल हे जरी स्पष्ट नसले तरी अजय भट, रामशंकर कथेरिया, जुगल किशोर शर्मा, श्रीकांत एकनाथ शिंदे, प्रतापसिंह, प्रेमचंद गुप्ता, संजय राऊत, सुधांशू त्रिवेदी, कन्वय्याप्रसाद टासा आदींचा समावेश आहे.
काही नेत्यांना झेड प्लस, काही नेत्यांना वाय प्लस सुरक्षितता कवच उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे नेत्यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कारवार जिल्हा पोलिसांची वाढली आहे. हे पथक आज सकाळी दिलीहून विमानाने गोव्यात दाखल होणार आहे. त्यानंतर हे पथक सी-बर्ड प्रकल्पस्थळी दाखल होणार आहे. कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरील माजाळी तपासणी नाक्यावर पथकाचे कारवार जिल्हा प्रशासनाकडून स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी प्रकल्पस्थळावरील कामांची पाहणी करून या पथकाचे वास्तव्य गोव्यात असेल, असे सीबर्ड प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले.
शरद पवारांच्या आगमनाबद्दल साशंकता
दरम्यान संसदीय संरक्षण स्थायी समितीच्या दौऱयाबद्दल सी-बर्ड प्रकल्पाचे पब्लिक रिलेशन ऑफिसरशी संपर्क साधला असता माजी संरक्षणमंत्री शदर पवार यांच्या आगमनाबद्दल अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
एस्कार्टिंगची जबाबदारी नौदल पोलिसांवर
बुधवारी सी-बर्ड प्रकल्पाला भेट देण्यासाठी दाखल होणाऱया महनीय व्यक्तींना एस्कॉर्टिंग करण्याची जबाबदारी नौदल पोलिसांवर सोपविली आहे. कर्नाटक-गोवा सीमेपासून प्रकल्पस्थळापर्यंत आणि पुन्हा येथून कर्नाटक-गोवा सीमेपर्यंतची एस्कॉटिंगची बाजू नौदल पोलीस पार पाडणार आहेत.